मुंबईत भाजप नेत्याचं कार्यालय फोडलं, सराईत गुन्हेगाराकडून हल्ला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईतील वडाळा परिसरात एका भाजप पदाधिकाऱ्याचे जनसंपर्क कार्यालय फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई: मुंबईतील वडाळा परिसरात एका भाजप पदाधिकाऱ्याचे जनसंपर्क कार्यालय फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. काल रात्री उशिरा झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आर. ए. के. मार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाड यांचं वडाळा येथे जनसंपर्क कार्यालय आहे. काल रात्री १० ते १०:३० च्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपीने कार्यालयावर हल्ला करत काचांची तोडफोड केली. कार्यालयाबाहेर काचांचा खच पडला असून, आतमधील खुर्च्या आणि इतर साहित्याचेही नुकसान करण्यात आलं आहे. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
सराईत गुन्हेगाराचे कृत्य
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव कैलास पठारे असून तो एक सराईत गुन्हेगार आहे. कैलास पठारे याने दारूच्या नशेत येऊन किरकोळ वादातून हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीनं यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती समोर येत आहे.
सुरुवातीला या घटनेमागे राजकीय वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, हा कोणताही पक्षीय वाद नसून केवळ किरकोळ भांडणातून आणि नशेत केलेल्या रागातून ही तोडफोड करण्यात आली आहे.
advertisement
आरोपी फरार; पोलिसांकडून शोध सुरू
घटनेनंतर आरोपी कैलास पठारे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. विजयसिंह गायकवाड यांच्या तक्रारीवरून आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 12:08 PM IST









