Mumbai Local: मुंबईकर 'बी' प्लॅन तयार ठेवा, 2 दिवस लोकलचा खोळंबा, तब्बल 215 फेऱ्या रद्द; का, कधी आणि कुठं?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Local: या ब्लॉकचा थेट फटका दैनंदिन प्रवाशांना बसणार असून, विशेषतः कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आज आणि उद्या मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या पाचवी व सहावी मार्गिका प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामांसाठी कांदिवली ते बोरिवली दरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस तब्बल 215 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून अनेक लोकल गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, सहाव्या मार्गिकेची जलद मार्गिकेशी जोडणी तसेच त्यासंदर्भातील सिग्नल व इतर यांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. यासाठी कांदिवली-बोरिवली दरम्यान दोन्ही दिशेच्या जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला आहे. अप जलद मार्गावर सोमवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून बुधवारी पहाटे 5.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर डाऊन जलद मार्गावर मध्यरात्रीनंतर 1 वाजल्यापासून पहाटे 4.30 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पाचव्या मार्गिकेवरील लोकल वाहतूकही थांबवण्यात येणार आहे.
advertisement
या ब्लॉकचा थेट फटका दैनंदिन प्रवाशांना बसणार असून, विशेषतः कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मंगळवारी 93 लोकल, तर बुधवारी 122 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असल्याने प्रवासाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
या प्रकल्पामुळे भविष्यात लोकल सेवेला मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दी कमी होणे, जलद लोकलची संख्या वाढणे आणि वेळेची बचत होणे असे फायदे या प्रकल्पातून अपेक्षित आहेत. या प्रकल्पासाठी 21 डिसेंबर ते 18 जानेवारी या कालावधीत विविध टप्प्यांत ब्लॉक जाहीर करण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन आधीच करावे, शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच पश्चिम रेल्वेच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 7:39 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकर 'बी' प्लॅन तयार ठेवा, 2 दिवस लोकलचा खोळंबा, तब्बल 215 फेऱ्या रद्द; का, कधी आणि कुठं?









