Kashmir Tiranga Yatra: शौर्य, एकता आणि सद्भावना, पहलगाम हल्ल्यातील शहीदांना मिळणार अनोखी श्रद्धांजली
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात, पर्यटनासाठी गेलेले 26 नागरिक ठार झाले होते.
पुणे: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अमानुष हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असला, तरी भारताने त्याला ठोस प्रतिउत्तर दिलं आहे. या पार्श्वभूमीवर एकात्मता, शांतता आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी 'काश्मीर तिरंगा यात्रा'चे आयोजन करण्यात आले आहे. लोकल 18 शी बोलताना विक्रांत सिंह यांनी या यात्रेविषयी सविस्तर माहिती दिली.
शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी काश्मीर तिरंगा यात्रा
पुण्यातून इन्कलाब जयेते आणि ‘Xploindia Tourism Development' यांच्या संयुक्त उपक्रमातून 12 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान ‘काश्मीर तिरंगा यात्रा’चं आयोजन करण्यात आलं आहे. ही यात्रा भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राबवली जात आहे. देशभरात ऐक्य, शौर्य आणि सद्भावनेचा संदेश पोहोचवणे, आणि पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणे, हा या यात्रेचा उद्देश आहे.
advertisement
सरकारी मदतीशिवाय स्वखर्चाने आयोजन
ही यात्रा कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय, पूर्णपणे स्वखर्चाने आयोजित केली जात आहे. यात्रेच्या केंद्रस्थानी साहस, साथ आणि संभावना, ही तीन मूल्यं आहेत. देशभरातून निवडले गेलेले सुमारे 70 प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सरकारी अधिकारी, खासगी क्षेत्रातील व्यावसायिक आणि माजी सैनिक या यात्रेत सहभागी होणार आहेत.
यात्रेतील महत्त्वाचे उपक्रम
यात्रेदरम्यान पहलगाममध्ये एक श्रद्धांजली कार्यक्रम घेतला जाणार आहे. या वेळी, हल्ल्यात शहीद झालेल्या 26 पीडितांच्या घरून माती आणली जाणार आहे. ही माती पहलगाममध्ये एकत्र करून त्या जागी 26 स्थानिक झाडं लावली जातील. ही झाडं त्या शहिदांचं प्रतीक म्हणून कायम पहलगाममध्ये उभी राहतील. तसंच, 15 ऑगस्टला श्रीनगरमधील अधिकृत स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. लाल चौकावर तिरंगा फडकवण्याची विनंतीही आयोजकांनी केली आहे. दल सरोवरात शिकारांच्या मदतीने 'जय हिंद' असा संदेश तयार केला जाईल आणि त्याचं ड्रोनद्वारे चित्रण केलं जाईल, असं आयोजकांनी सांगितलं.
advertisement
परवानग्या आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याचा प्रयत्न
यात्रेसाठी आवश्यक परवानग्या मिळाव्यात यासाठी गृहमंत्रालय, पर्यटन मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकारकडे विनंती करण्यात आली आहे. तसेच सीआरपीएफ व स्थानिक पोलिसांकडूनही सुरक्षा सहाय्याची मागणी करण्यात आली आहे.
देशभक्ती आणि एकतेची सलामी
view commentsही यात्रा केवळ एक कार्यक्रम नसून देशासाठी बळी गेलेल्यांच्या स्मृतींसाठी आणि एकतेसाठी दिली जाणारी सलामी आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमातून देशभक्ती अधिक बळकट होणार असून, काश्मीरसारख्या संवेदनशील भागात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 07, 2025 4:06 PM IST
मराठी बातम्या/देश/
Kashmir Tiranga Yatra: शौर्य, एकता आणि सद्भावना, पहलगाम हल्ल्यातील शहीदांना मिळणार अनोखी श्रद्धांजली










