टेकऑफनंतर हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, थेट समुद्रातल्या लाटांवर क्रॅश लॅण्डिंग, 7 प्रवाशांचं काय झालं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पवन हंसच्या हेलिकॉप्टरला अंदमान समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश-लँडिंग करावी लागली, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे सातही जणांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.
एअर अॅम्ब्युलन्स विमानाचा अपघात होऊन ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. अंदमानच्या अथांग समुद्रात मंगळवारी सकाळी पवन हंस कंपनीच्या हेलिकॉप्टरचा थरार पाहायला मिळाला. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं, मात्र वैमानिकानं दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून सातही जणांना रेस्क्यू करण्यात मोठं यश आलं आहे.
समुद्रात 'क्रॅश-लँडिंग'चा थरार
सकाळी ९:३० च्या सुमारास पवन हंसचे हे हेलिकॉप्टर पोर्ट ब्लेअरहून मायाबंदरच्या दिशेने झेपावले होते. टेकऑफनंतर काही वेळातच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. जमिनीवर किंवा धावपट्टीवर परतणे अशक्य असल्याचे पाहून, वैमानिकाने अतिशय शिताफीने हेलिकॉप्टर अंदमान समुद्राच्या लाटांवर उतरवण्याचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे हेलिकॉप्टरमधील दोन क्रू सदस्यांसह सातही प्रवाशांचे प्राण वाचलं.
advertisement
काही मिनिटांत बचावकार्य पूर्ण
हेलिकॉप्टर समुद्रात कोसळल्याची माहिती मिळताच नौदल आणि स्थानिक बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या सातही जणांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. प्रवाशांना किरकोळ ओरखडे आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पवन हंसच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
advertisement
पवन हंस दुर्गम भागाची जीवनवाहिनी
१९८५ मध्ये स्थापन झालेली पवन हंस ही केंद्र सरकारची सर्वात मोठी हेलिकॉप्टर सेवा पुरवणारी कंपनी आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागातील प्रवासासाठी या कंपनीची सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अंदमान-निकोबार सारख्या बेटांच्या समूहावर वाहतुकीसाठी या सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अनेक दिग्गज राजकारणी आणि पर्यटकही या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सेवेवर अवलंबून असतात.
Location :
Andaman & Nicobar Islands
First Published :
Feb 24, 2026 1:43 PM IST
मराठी बातम्या/देश/
टेकऑफनंतर हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, थेट समुद्रातल्या लाटांवर क्रॅश लॅण्डिंग, 7 प्रवाशांचं काय झालं?







