Pm Modi Interview : महागाई, यूपीआय आणि जनधनबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? वाचा संपूर्ण मुलाखत
- Published by:Mohini Vaishnav
- trending desk
Last Updated:
पीएम मोदी म्हणाले की, या शिवाय क्रिप्टो असो किंवा सायबर दहशतवाद, तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्द्यांवर जागतिक सहकार्यासाठी भारताच्या आवाहनाला विश्वासार्ह मानलं जातं.
मुंबई : मनीकंट्रोल डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महागाई, एलपीजी, यूपीआय, जनधन आणि दहशतवादासह अनेक विषयांवरील प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. पीएम मोदी म्हणाले की, प्रतिकूल परिस्थिती आणि जागतिक गतिमानता असूनही, भारतातील चलनवाढ 2022 च्या जागतिक सरासरी दरापेक्षा दोन टक्के कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण मुलाखत वाचा.
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगासमोर महागाई ही एक मोठी समस्या आहे. अगोदर महामारी आणि नंतर युद्धामुळे जागतिक चलनवाढीची गती बदलली आहे. त्यामुळे विकसित देश आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या दोन्ही देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. हा एक जागतिक मुद्दा आहे, ज्यासाठी सहकार्य आवश्यक आहे. ते म्हणाले की, आपल्या G20 अध्यक्षपदाच्या काळात, G20 देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांची बैठक झाली होती. चलनवाढीचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाने स्वीकारलेल्या धोरणांचा इतर देशांवर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचं या फोरमनं मान्य केलं. या व्यतिरिक्त, मध्यवर्ती बँकांद्वारे वेळेवर धोरणात्मक भूमिका आणि स्पष्ट संवाद महत्त्वाचा आहे.
advertisement
2. पंतप्रधान मोदींनी मुलाखतीदरम्यान सांगितलं की, भारताचा विचार केल्यास, आम्ही महागाई नियंत्रणासाठी अनेक पावले उचलली आहेत. कठीण परिस्थिती आणि जागतिक गतिमानता असूनही, भारताची चलनवाढ 2022 मधील जागतिक सरासरी महागाई दरापेक्षा दोन टक्के कमी होती. तरीसुद्धा, आम्ही गाफिल राहिलो नाही आणि लोकांचं जीवन सुलभ करण्यासाठी लोकहितवादी निर्णय घेत आहोत. उदाहरण देताना पीएम मोदी म्हणाले की, अलीकडेच त्यांच्या सरकारनं रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व ग्राहकांसाठी एलपीजीच्या किमती कमी केल्या.
advertisement
3. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आपल्या टेक टॅलेंटसाठी जगभरात ओळखला जातो. आज आपली तांत्रिक प्रतिभा आणि तांत्रिक कौशल्य अशा दोन्हींसाठी भारत ओळखला जातो, विशेषतः डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी. तुम्ही (मुलाखतकाराने) नमूद केल्याप्रमाणे, गेल्या नऊ वर्षांत सुरू करण्यात आलेल्या अनेक उपक्रम आणि फोरमचा अर्थव्यवस्थेवर अनेकपटींनी परिणाम होत आहे. भारतातील तंत्रज्ञान क्रांतीचा केवळ आर्थिक प्रभावच नाही तर सखोल सामाजिक परिणामही झाला आहे. ते म्हणाले की, आम्ही आमच्या चर्चेत ज्या मानव केंद्रित मॉडेलबद्दल बोलत होतो ते तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या पद्धतीवरून स्पष्टपणे दिसून येतं. आमच्यासाठी तंत्रज्ञान हे लोकांना सक्षम करण्याचं, वंचितांपर्यंत पोहोचण्याचं आणि विकास व कल्याणाला शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याचं साधन आहे.
advertisement
4. पीएम मोदी म्हणाले की, आज जनधन-आधार-मोबाइल (जेएएम) या त्रिमूर्तीमुळे, अगदी गरीब आणि आर्थिकदृष्ट्या सर्वात कमकुवत लोक देखील सशक्त वाटत आहेत. कारण, त्यांचे अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. महामारीच्या काळात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यात तंत्रज्ञानानं आम्हाला ज्या प्रकारे मदत केली ती नेहमीच लक्षात राहील. ते म्हणाले की, आज जेव्हा परदेशी प्रतिनिधी भारतात येतात तेव्हा रस्त्यावरील विक्रेते ग्राहकांना यूपीआयद्वारे, क्यूआर कोडद्वारे पैसे देण्यास सांगतात, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. जगातील रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास निम्मा वाटा भारताचा आहे यात आश्चर्य नाही! इतर देश यूपीआयमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत. भारतीयांना भारताबाहेर यूपीआयद्वारे पैसे देण्यासाठी पर्याय निर्माण होत आहे! आज लाखो लघुउद्योजकांना सरकारी ई-मार्केटप्लेसद्वारे सार्वजनिक खरेदीचा एक भाग होण्यासाठी समान संधीचा लाभ मिळत आहे.
advertisement
5. पीएम मोदी म्हणाले की, महामारीच्या काळात, COWIN टेक प्लॅटफॉर्मच्या मदतीनं आम्ही 200 कोटींहून अधिक लोकांना मोफत लसीचे डोस दिले. आम्ही संपूर्ण जगासाठी हा प्लॅटफॉर्म ओपन-सोर्स देखील ठेवला आहे. पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा महामारीचा फटका बसला तेव्हा भारताची कामगिरी कशी होईल याची सर्वांनाच उत्सुकता होती. आम्ही स्पष्ट आणि समन्वित दृष्टिकोनानं साथीच्या रोगाचा सामना केला. आम्ही गरीब आणि दुर्बलांच्या गरजांची काळजी घेतली. आमच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी कल्याणकारी सहाय्य थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेमध्ये 200 कोटी डोस मोफत देण्यात आले. आम्ही 150 हून अधिक देशांमध्ये लस आणि औषधे देखील पाठवली. हे मान्य केलं गेलं की, प्रगतीची आमची मानव-केंद्रित दृष्टी साथीच्या आजारापूर्वी, साथी दरम्यान आणि नंतर योग्यप्रकारे काम करत होती. त्याच वेळी, जगाला संघर्षाच्या बहुआयामी प्रभावाचा सामना करावा लागत असतानाही आपली अर्थव्यवस्था दीर्घकाळ ग्लोबल ब्राईट स्पॉट होती आणि भविष्यात राहील.
advertisement
6. पीएम मोदी म्हणाले की, या शिवाय क्रिप्टो असो किंवा सायबर दहशतवाद, तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्द्यांवर जागतिक सहकार्यासाठी भारताच्या आवाहनाला विश्वासार्ह मानलं जातं. कारण आपण असं राष्ट्र आहोत ज्याकडे सार्वजनिक क्षेत्रातील नावीन्य आणि तंत्रज्ञानाचा सखोल अनुभव आहे. ते म्हणाले की, दहशतवादापासून ते काळ्या पैशांपर्यंत, पुरवठा साखळीतील लवचिकता ते हवामानविषयक जागरूक विकास, आम्ही गेल्या काही वर्षांत होत असलेल्या चर्चा आणि कृतींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. G20 मध्ये उपस्थित झाल्यानंतर, या मुद्द्यांवर जागतिक सहकार्यामध्ये प्रशंसनीय विकास झाला आहे. अर्थात, सुधारणेसाठी नेहमीच संधी असते, जसे की ग्लोबल साउथचा अधिक सहभाग आणि आफ्रिकेची मोठी भूमिका इत्यादींबद्दल G20 अध्यक्ष असताना भारत काम करत आहे.
advertisement
7. पीएम मोदी म्हणाले की, आमच्या G20 अध्यक्षपदाच्या समाप्तीपर्यंत, सर्व 28 राज्यं आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधील 60 शहरांमध्ये 220 हून अधिक बैठका झाल्या आहेत. सुमारे 125 देशांतील 1 लाखांहून अधिक सहभागींनी भारताला भेट दिली आहे. आपल्या देशात दीड कोटींहून अधिक लोकांनी या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे किंवा त्यांच्या विविध पैलूंबद्दल माहिती घेतली आहे. या प्रमाणात बैठका आयोजित करणं आणि परदेशी प्रतिनिधींचं आदरातिथ्य करणं हा एक प्रयत्न आहे, जो पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक, संवाद कौशल्य, आदरातिथ्य आणि सांस्कृतिक क्रियाकलापांच्या बाबतीत उत्तम क्षमता निर्माण करण्याची मागणी करतो. G20 प्रेसिडेन्सीचं लोकशाहीकरण म्हणजे देशभरातील विविध शहरांमध्ये लोकांची, विशेषत: तरुणांची क्षमता निर्माण करण्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. शिवाय, 'लोक सहभाग' या आमच्या ब्रीदवाक्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. आमचा विश्वास आहे की, कोणत्याही उपक्रमाच्या यशात लोक सहभाग हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो.
8. जेव्हा पीएम मोदींना विचारण्यात आलं की तुमचं वय 72 वर्षे आहे, परंतु तुमची एनर्जी लेव्हल खूप जास्त आहे. असं काय आहे जे तुम्हाला अॅक्टिव्ह ठेवतं? तर ते म्हणाले की, जगभरात असे अनेक लोक आहेत जे आपली ऊर्जा, वेळ आणि संसाधने पूर्णपणे एका मिशनसाठी वापरतात. या बाबतीत मी एकटा किंवा अपवाद आहे असं नाही. राजकारणात येण्यापूर्वी अनेक दशके मी समाजातील तळागाळातील लोकांमध्ये सक्रियपणे काम करत होतो. या अनुभवाचा एक फायदा असा झाला की, मी अनेक प्रेरणादायी लोकांना भेटलो ज्यांनी स्वतःला एका कारणासाठी पूर्णपणे समर्पित केलेलं आहे. दुसरा पैलू म्हणजे महत्त्वाकांक्षा आणि ध्येय यातील फरक. जेव्हा एखादी व्यक्ती महत्त्वाकांक्षेतून काम करते तेव्हा तिला मार्गात आलेले कोणतेही चढउतार त्रास देऊ शकतात. कारण महत्त्वाकांक्षा ही पद, सत्ता, सुखसोयी इत्यादींच्या आसक्तीतून येते. पण, जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या मिशनसाठी काम करते तेव्हा तिचा वैयक्तिक फायदा नसतो. त्यामुळे चढ-उतारांचा तिच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. एखाद्या मिशनसाठी समर्पित असणं हा दुर्दम्य आशावाद आणि उर्जेचा स्त्रोत आहे. शिवाय, मिशनच्या भावनेबरोबरच अनावश्यक गोष्टींपासून अलिप्ततेची भावना येते, जी महत्त्वाच्या गोष्टींवर पूर्णपणे ऊर्जा केंद्रित करण्यास मदत करते. माझा देश आणि माझ्या लोकांच्या विकासासाठी काम करणं हे माझे ध्येय आहे. हे मला खूप ऊर्जा देतं, कारण आम्हाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
9. पीएम मोदी म्हणाले की, भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. हे खरोखरच अतिशय महत्त्वाचं आहे. पण, आपल्या देशाने ज्या पद्धतीने हे केले, ते तितकेच महत्त्वाचं आहे. हे एक यश आहे. कारण एक असं सरकार आहे ज्यावर जनतेचा विश्वास आहे आणि त्या बदल्यात सरकारचा देखील जनतेच्या क्षमतेवर विश्वास आहे. ते म्हणाले की, लोकांनी आमच्यावर अभूतपूर्व विश्वास टाकला ही आमच्यासाठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे. त्यांनी आम्हाला एकदा नव्हे तर दोनदा बहुमत दिलं. पहिला जनादेश आश्वासनांचा होता आणि दुसरा त्याहूनही मोठा, कार्यप्रदर्शन व देशासाठीच्या आमच्या भविष्यातील योजनांचा होता. या राजकीय स्थिरतेमुळे प्रत्येक क्षेत्रात सखोल संरचनात्मक सुधारणा दिसू शकतात. अर्थव्यवस्था, शिक्षण, सामाजिक सबलीकरण, कल्याणकारी वितरण, पायाभूत सुविधा अशा क्षेत्रांमध्ये सुधारणा झाल्या आहेत. त्या मी नमूद करू शकतो.
10. पीएम मोदी पुढे म्हणाले की, भारतातील थेट परकीय गुंतवणूक वर्षानुवर्षे विक्रम मोडत आहे. सेवा आणि वस्तू या दोन्ही क्षेत्रांत निर्यात विक्रम मोडत आहे. मेक इन इंडियानं सर्व क्षेत्रांत मोठं यश संपादन केलं आहे. स्टार्टअप्स आणि मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगनं आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पायाभूत सुविधा अशा गतीने उभारल्या जात आहेत ज्या या आधी कधीही नव्हत्या आणि या सगळ्यामुळे आपल्या तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. विकासाचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले जात आहेत. एक सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा जाळं आपल्या देशातील गरिबांचं संरक्षण करतं आणि सरकार त्यांना गरिबीविरुद्धच्या लढ्यात प्रत्येक टप्प्यावर मदत करत आहे. केवळ पाच वर्षांत आपल्याकडील 13.5 कोटींहून अधिक लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आल्यानं, एक महत्त्वाकांक्षी नव-मध्यमवर्ग आकार घेत आहे. समाजातील हा वर्ग आणखी प्रगतीसाठी तयार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2023 1:59 PM IST
मराठी बातम्या/देश/
Pm Modi Interview : महागाई, यूपीआय आणि जनधनबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? वाचा संपूर्ण मुलाखत


