पीएम मोदींची आसाममध्ये एंट्री, सभा ठरणार गेमचेंजर; राज्यातील समीकरणे बदलणार
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पंतप्रधान मोदी 1, 3, 6 एप्रिलला आसाममध्ये तीन सभा घेणार. भाजप-आघाडी व काँग्रेसमध्ये थेट लढत. हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्नात.
नवी दिल्ली : आगामी आसाम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1, 3 आणि 6 एप्रिल रोजी आसाममध्ये तीन निवडणूक सभा घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही देशातील सहा भागांमध्ये विविध निवडणूक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून अनेक सभा घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान निवडणूक आयोगाने रविवारी आसाममधील सर्व 126 विधानसभा मतदारसंघांसाठी 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याची घोषणा केली आहे. मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप-आघाडी (NDA) आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस सत्तांतर करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरली आहे.
advertisement
मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, भाजप आपल्या उमेदवारांची यादी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर जाहीर करणार आहे. भाजपचे मित्रपक्ष Asom Gana Parishad (AGP) 26 जागांवर, तर Bodoland People's Front (BPF) 11 जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
आसाममध्ये एकूण 126 जागा असून भाजप सुमारे 89 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
advertisement
AGP 26 जागांवर, BPF 11 जागांवर आणि उर्वरित जागांवर भाजप निवडणूक लढवेल. आज आम्ही प्राथमिक चर्चा केली. उद्या संसदीय मंडळाची बैठक आहे. कदाचित उद्या रात्री उशिरा किंवा पुढील सकाळी उमेदवारांची यादी जाहीर होईल, असे सरमा यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि आसाम भाजप अध्यक्ष दिलीप सैकिया यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
advertisement
बोर्डोलोई यांनी काँग्रेस नेतृत्वावर त्यांना डावलल्याचा आरोप केला असून त्यामुळे त्यांनी पक्षाशी असलेले दीर्घकाळाचे नाते संपवले. त्यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय केवळ तिकीट न मिळाल्यामुळे नव्हता, तर अनेक मुद्द्यांमुळे त्यांनी पक्ष सोडला.
माझ्यासाठी तिकीट मिळणे हा जीवन-मरणाचा प्रश्न नव्हता. अनेक मुद्दे होते. माझ्यासाठी स्वाभिमान महत्त्वाचा होता. काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिले आहे, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
advertisement
मी लोकसभेत दुसऱ्या कार्यकाळात आहे आणि अजून तीन वर्षे बाकी आहेत. जर मला खासदार राहायचे असते तर अपमान सहन केला असता. पण मी पक्ष सोडून काम करण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 8:10 PM IST










