ऐकावे ते नवलंच! कोल्हापुरात मिळतोय चक्क डायट खाकरा, अनिताबेन यांच्या हाताच्या चवीची खवय्यांना भुरळ
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
खाकरा हा एक गुजराती नमकिन पदार्थ आहे. मात्र याच पदार्थाला आपली ओळख बनवत कोल्हापुरात एका महिलेने आपला व्यवसाय सांभाळला आहे.
खाकरा हा एक गुजराती नमकिन पदार्थ आहे. मात्र याच पदार्थाला आपली ओळख बनवत कोल्हापुरात एका महिलेने आपला व्यवसाय सांभाळला आहे. गेली कित्येक वर्षे हाताने बनलेल्या चविष्ट खाकरासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अनिताबेन यांनी वेगवेगळ्या चवींच्या खाकराची कोल्हापूरकरांना भुरळ पाडली आहे. फक्त कोल्हापुरातच नाही तर देश विदेशात देखील त्यांचा खाकरा जाऊन पोहोचला आहे. गेली 34 वर्षांपासून अनिताबेन खाकरावाला हा व्यवसाय मोठ्या हिमतीने इतर महिलांना सोबत घेऊन चालवला आहे.
advertisement
55 वर्षीय अनिताबेन विनोद शहा या 1986 साली लग्नानंतर कोल्हापूरच्या झाल्या. त्यांचे पती विनोद शहा खाजगी कंपनीत मुनीमजी म्हणून कार्यरत होते. लग्नानंतर काहीच वर्षांनी 1989 साली त्यांनी स्वतःचा खाकरा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीची सहा वर्षे त्या एकट्याच हा व्यवसाय करत असत. त्यानंतर एकेक करत त्यांनी महिलांना रोजगार द्यायला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे 13 महिला कामासाठी येतात, असे अनिताबेन यांनी सांगितले.
advertisement
अनीताबेन खाकरावाला हा व्यवसाय मोठा करण्यासाठी अनिता शहा यांना त्यांच्या जावेचा खूप मोठा पाठिंबा होता. तू काहीतरी कर, स्वतःच्या पायावर उभी रहा अशा सांगणाऱ्या जाऊबाईंनी त्यांना वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन केल्याचे अनिता सांगतात. व्यवसाय सुरू केल्यानंतर साधारण 10 वर्षांनी अनिता यांच्या मुलाने आईचाच व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सध्या कोल्हापुरात 2 ठिकाणी अनिताबेन यांचा खाकराचा व्यवसाय चालतो.
advertisement
अनिताबेन यांनी खाकराचा व्यवसाय सुरू केल्यानंतर काही वर्षांनी मशिन्स घेतल्या होत्या. मात्र हाताने बनवलेल्या खाखऱ्याचीच मागणी होती. त्यामुळे त्यांनी आजतागायत खाकरा हाताने लाटून बनवणे सुरू ठेवले आहे. फक्त खाकरा पटपट भाजून होण्यासाठी 2015 साली त्यांनी एक मशीन घेतले होते. खाखऱ्याची अजून एक खासियत म्हणजे बनवले जाणारे सर्व प्रकारचे खाकरा हे जैन पद्धतीचे असतात, असेही अनिता यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
advertisement
खाकरा बनवताना गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो. यामध्ये मसाला खाखऱ्यासाठी मसाला, लाल मिरची, ओवा, हळद, मीठ आणि धने-जिरे पूड हे घटक पीठ मळताना वापरले जातात. मेथी खाखऱ्यासाठी या घटकांसह कसुरी मेथी वापरली जाते. जीरा खाकरा बनवताना गव्हाचे पीठ, मीठ आणि जिरे बारीक करून घातले जातात. डाएट खाकरा हा फक्त पातळ चपाती लाटून विनातेलाचा भाजून बनवला जातो. तर घी खाकरा बनवताना भरपूर असे गाईचे तुप लावून बनवला जातो, अशी माहिती देखील अनिता यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान, साधा खाकरा 260 रुपये किलो, मसाला, मेथी, जीरा खाकरा 300 रुपये किलो तर घी खाकरा 400 रुपये किलो दराने विक्री केली जाते. अनिताबेन यांच्या खाकरा बनवण्याच्या ठिकाणीच ही विक्री केली जाते. बाहेरगावी कोणाला हवे असल्यास पार्सल देखील पाठवले जाते. त्यामुळेच अनिताबेन यांच्याकडे दोन्ही ठिकाणी रोज साधरण 40 ते 45 किलो खाकरा बनवला आणि विकला जातो.पत्ता : इ वॉर्ड, 1 ली गल्ली, शाहुपुरी, कोल्हापूर - 416001