काश्मिरी गुलाबी चहा आता कोल्हापुरात, आरोग्यासाठीही फायदेशीर, रेसिपी पाहा
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा चहा मिळतो. काश्मीरच्या काहवा पासून बनवलेल्या गुलाबी चहाची अनोखी चव कोल्हापूरच्या चहाप्रेमींना चाखता येत आहे.
भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा चहा मिळतो. अशाच प्रकारे कोल्हापुरात अख्ख्या महाराष्ट्रात न मिळणारा काश्मिरी गुलाबी चहा मिळायला सुरुवात झाली आहे. एका तरुणाने हा चहाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे काश्मीरच्या काहवा पासून बनवलेल्या गुलाबी चहाची अनोखी चव कोल्हापूरच्या चहाप्रेमींना चाखता येत आहे.
advertisement
इमरान शेख हा कोल्हापूरच्या जरगनगर परिसरात राहणारा तरुण असून तो एक वेडिंग फोटोग्राफर म्हणून काम करतो. मात्र जोडधंदा म्हणून त्याने कोल्हापूरच्या चहाप्रेमींसाठी एक अनोखा टी स्टॉल सुरू केलाय. साधा चहा आणि कॉफी बरोबर असताना काश्मिरी काहवा वापरून बनवलेला गुलाबी चहा विकायला सुरुवात केली आहे. वेगळी चव आणि वेगळा रंग यामुळे अनेक चहाप्रेमी या ठिकाणी चहा पिण्यासाठी येत आहेत.
advertisement
वेडिंग फोटोग्राफर असल्यामुळे इमरानला देशभरात विविध ठिकाणी कामानिमित्त जावे लागते. अशाच प्रकारे काही महिन्यांपूर्वी एका प्री वेडिंग फोटोशूटच्या कामासाठी तो श्रीनगर येथे गेला होता. त्या ठिकाणी हा असा चहा त्याला प्यायला मिळाला. तिथे या चहाला नून चहा म्हणतात. पण महाराष्ट्रात अशा प्रकारचा चहा कुठेच भेटत नाही हे त्याच्या लक्षात आले. म्हणूनच कोल्हापुरात अशा प्रकारचा काश्मिरी गुलाबी चहा विकायला सुरू केला. मग हा चहा बनवण्यासाठी लागणारे सर्व घटक कोल्हापूर किंवा आसपासच्या भागात मिळत नसल्यामुळे ते तिकडूनच आणल्याचे इमरान सांगतो.
advertisement
कश्मीरचा काहवा सर्वत्र प्रसिद्ध आहे. हा गुलाबी चहा त्यातीलच एक प्रकार आहे. मात्र चहाचा काहवा हा गुलाबी चहा बनवण्यासाठी वापरला जातो. काहवा वापरून केलेला गुलाबी चहा हा आरोग्यासाठी देखील चांगला असतो. हृदय तंदुरुस्त राहण्यासाठी हा चहा उत्तम मानला जातो. यामुळे हाडातील कॅल्शियम वाढण्यासही मदत होते. तसेच मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना देखील हा चहा उत्तम ठरतो, अशी माहिती देखील इमरानने दिली आहे.
advertisement
सुरुवातीला चहासाठी हा लिक्विड काहवा बनवून घ्यावा लागतो. फ्रिजमध्ये साधारण दोन ते तीन दिवस हा टिकतो. मात्र एकावेळी बनवण्यासाठीच त्याला दोन ते अडीच तासांचा वेळ द्यावा लागतो. हा काहवा बनवताना पाण्यामध्ये बदाम, वेलची, दालचिनी, मीठ, पिस्ता आणि बेकिंग सोडा अधिक घटक टाकून उकळले जाते. साधारण दोन ते अडीच लिटर पाण्याचे हे मिश्रण उकळून जवळपास अर्धा लिटर केले जाते. त्यामुळेच त्या लिक्विड काहवाला असा रंग येतो.
advertisement
चहा बनवताना याच लिक्विड काहवाचा वापर केला जातो. याच्यामुळेच चहाला थोडाफार गुलाबी असा रंग येतो. असा गुलाबी चहा बनवण्यासाठी दूध गरम करून थोडी साखर त्यात टाकली जाते. एक-दोन चमचे हा लिक्विड काहवा त्या दुधामध्ये टाकला जातो. त्याला उकळी फुटली की तो चहा पिण्यासाठी तयार होतो, असेही इमरानने स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान इमरानचे हे चहा सेंटर कोल्हापूरचा रंकाळ्यावरील अंबाई टँक ते हरी ओम नगर रोडवर आहे. साध्या चहा-कॉफी बरोबरच गुलाबी चहा, बिस्किट कपातील चहा असे फक्त बारा रुपयांपासून ते 30 रुपयांपर्यंत वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी मिळतात. त्यामुळे कोल्हापूर शहरातील अनेक चहाप्रेमी या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत.