साडेचार वर्षांच्या अन्वीची कमाल, सर केले तामिळनाडू आणि केरळचे सर्वोच्च शिखर, ठरली जगातील सर्वात लहान गिर्यारोहक
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
एखादा गड किंवा डोंगर चढताना भल्याभल्यांची दमछाक होत असते. मात्र कोल्हापूरची चिमुकली कन्या अन्वी घाटगे ही कित्येक डोंगर आणि किल्ले सर करणारी सर्वात छोटी गिर्यारोहक आहे.
एखादा गड किंवा डोंगर चढताना भल्याभल्यांची दमछाक होत असते. मात्र कोल्हापूरची चिमुकली कन्या अन्वी घाटगे ही कित्येक डोंगर आणि किल्ले सर करणारी सर्वात छोटी गिर्यारोहक आहे. याआधी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील देखील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या अन्वीने आता तामिळनाडू आणि केरळचे सर्वोच्च शिखर सर करण्याचा मान मिळवला आहे. तिच्या आई वडिलांसह तिने ही मोहीम मराठी नववर्षाचा स्वागताच्या निमित्ताने आखली होती.
advertisement
मूळचे हातकणंगले तालुक्यातील नेज येथील असणारे घाटगे कुटुंब कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात घाटगे कुटुंब राहते. या कुटुंबातील अन्वीला किल्ले सर करण्याचे बाळकडू तिच्या घरातूनच वडील चेतन आणि आई अनिता घाटगे यांच्याकडून मिळाले. त्यामुळेच आज ती एक उत्तम गिर्यारोहक बनत आहे. तिच्या यशाचाच पुढचा टप्पा म्हणून गुढीपाडवा आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ही केरळ आणि तामिळनाडूमधील ही मोहीम आखली होती. मोहिमेसोबतच "निसर्ग, पर्यावरण वाचवा. आरोग्यपुर्ण आयुष्य वाढवा'', हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असे अन्वीची आई अनिता घाटगे यांनी सांगितले.
advertisement
7 एप्रिल रोजी सुरू करण्यात आलेली ही मोहीम सह्याद्री पर्वत रांगेतील आणि केरळ राज्यातील सर्वोच्च असणारे मिसापुल्लीमला हे 8661 फुट उंच शिखर सर करण्यापासून झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण तरीही अवघ्या 90 मिनिटांमध्ये हे शिखर अन्वीने सर केले असुन हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेली आहे. याबाबतचे प्रमाणपत्र केरळ फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मुनारचे मॅनेजिंग डायरेक्टर जॉर्जी मथचान, डिव्हीजनल मॅनेजर मिथुन मोहन यांनी दिले आहे.
advertisement
तसेच 9 एप्रिल रोजी मराठी नववर्षारंभानिमित्त निलगिरी पर्वत रांगेतील आणि तमिळनाडु राज्यातील सर्वोच्च अरणारे दोडाबेट्टा हे 8652 फुट उंच शिखर अन्वीने 50 मिनिटांमध्ये सर केले. या दोडाबेट्टा शिखरावरुन तिने तमाम मराठी बांधवांना नविन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या. तिच्या या मोहिमेत तमिळनाडू वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही तिच्यासोबत होते.
advertisement
तर दोडाबेट्टा शिखर सर्वात लहान वयात सर करणारी अन्वी ही जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली. याबाबतचे प्रमाणपत्रही निलगिरी डिस्ट्रीक फॉरेस्ट ऑफिस तमिळनाडूचे डीएफओ गौतम यांनी दिले आहे. त्याचबरोबर या मोहिमे दरम्यान अन्वीने किल्ले हुलीहुर, श्रीरंगपट्टणम पोर्ट, किल्ले चित्रदुर्ग, किल्ले कित्तुर, किल्ले बेळगांवी, किल्ले लालबेथरी, किल्ले राजहंसगड, किल्ले वल्लभगड असे आठ किल्ले सर केलेले आहेत, अशी माहिती अन्वीची आई अनिता घाटगे यांनी दिली आहे.
advertisement
advertisement
आजवर अन्वी घाटगे या चिमुकल्या मुलीने 6 सर्वोच्च शिखरासह 54 गडकिल्ले, 17 जंगल भ्रमंती केल्या आहेत. तर आतापर्यंत 150 हून अधिक मानसन्मान आणि पुरस्कार तिला प्राप्त झालेले आहेत. तसेच 2 वेळा वर्ल्ड रेकॉर्ड, 3 वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, 2 वेळा आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही अन्वीच्या नावाची नोंद झालेली आहे. दरम्यान मोहीम फत्ते करून घरी परतल्यानंतर स्वस्थ न बसता पुन्हा त्याच जोमात नव्या मोहिमेवर जाण्याचे तयारी सुरू केली आहे असेही अनिता यांनी स्पष्ट केले आहे.