स्वप्नात दिला दृष्टांत अन् उभी राहिली विदर्भातील प्रति पंढरी, त्रिवेणी संगमावरील हे ठिकाण माहितीये का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भातील प्रति पंढरी म्हणून त्रिवेणी संगमावर वसलेलं चंद्रपूर जिल्ह्यातील वढा हे ठिकाण ओळखळं जातं.
विदर्भातील प्रति पंढरी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील वढा हे गाव ओळखलं जातं. या गावातील त्रिवेणी संगमावर वसलेलं विठ्ठलाचं मंदिर हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असून आषाढी-कार्तिकी एकादशीला इथे भक्तांची प्रचंड गर्दी होते. पालखी, यात्रा, दिंडी, वारी,अशाप्रकारे भक्त आपल्या श्रद्धा भावना व्यक्त करत असतात.
advertisement
वर्धा, वैनगंगा व निरगुडा या नद्यांच्या संगमावर वसलेल्या वढा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भरणा-या यात्रेकरिता दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी जमते. याच ठिकाणी प्राचीन विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती असून तेव्हापासून यात्रा भरत असल्याची माहिती आहे. विठ्ठलाच्या पायी नतमस्तक होण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक याठिकाणी येतात.
advertisement
वढा येथील विठ्ठल मंदिर कसं उभा राहिलं? याबाबत स्वामी चैतन्य महाराज यांनी माहिती दिलीय. "मला ही मूर्ती नेहमी ध्यानामध्ये दिसायची व स्वप्नात पण दिसायची. मला वाटलं माझा भ्रम आहे. एक दिवस मी सहज देवाला म्हटलं की तू खरंच असशील तर लोकांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांग की मी इथे आहे. आणि खरंच दोन-तीन दिवसांमध्ये सुलभा सावे, भाऊराव गोवारदिपे, मारुती पुरठकर यांच्या स्वप्नात जाऊन सांगितले की मी संगमामध्ये आहे मला काढण्यात यावे.
advertisement
चार-पाच महिन्यांनी विचार केला आणि गावातल्या लोकांना विठ्ठल नामांचा जप करण्याकरिता सांगितला. तीन महिन्यानंतर पुरुषोत्तम मासाला अधिकमासामध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलं की या ठिकाणी मूर्ती आहे आणि ती काढायची आहे. 25 मे 20185 मध्ये कमला एकादशी दिवशी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी ही मूर्ती काढण्याचा निर्णय घेतला, असे चैतन्य स्वामी सांगतात.
advertisement
याबाबत लोकांना माहीत झालं आणि त्या वेळेवर गर्दी जमू लागली. वर्धा, पैनगंगा, निर्गुडा नदीच्या संगमवरती वीस हजाराच्या वरती लोक आले आणि खूप गर्दी झाली. आम्ही देवाला विनंती केली की इतकी गर्दी झालेली आहे. तूच ती गर्दी सांभाळ आणि सगळे लोक शांत रांगेत बसले आणि त्यावेळेस अलोट आनंद झाला की इतकी लोकं होते तरीपण इतकी शांती होती की खरंच देवच येणार आहे. रेती काढली आणि पाच ते सात इंचा वरती सुंदर अशी उबड्या(पालथ्या) स्थितीमध्ये देवाची मूर्ती होती. मूर्तीही चार फूट सात इंच येवढी आहे आहे.अशी माहिती स्वामी चैतन्य महाराजांनी दिली.
advertisement
दररोज विठ्ठलाच्या आरती, पूजा स्वामी चैतन्य महाराजांकडून केली जाते. नैवेद्य दाखवला जातो. मूर्तीला कपाळावर चंदनांचा टिळा, आणि ऋतूनुसार योग्य कपडे परिधान करून दिले जातात. सध्या दररोज काकडा आरती होत असून भक्तांची उपस्थिती असते. तीन दिवस चालणारी वढा यात्रा चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांसाठी विशेष महत्वाची आहे
advertisement
यवतमाळ जिल्ह्यातील वणी या शहरातून वाहणारी निर्गुडा नदी, रुक्मिणी मातेचे माहेर असलेल्या कौंडिण्यपूर येथे उगम पावणारी पैनगंगा नदी आणि विदर्भाची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा अनोखा संगम वढा परिसरात होतो. या त्रिवेणी संगमावर स्नान करून उंच बांधलेल्या विठू-रुख्माई मंदिरात दर्शन घेत संगमस्थळी पूजा करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. बच्चेकंपनी साठी खाद्यपदार्थ आणि खेळण्यांची दुकाने आकर्षण असतं.
advertisement
advertisement
गेल्या काही वर्षात मंदिर परिसरात काही सोयीसुविधा करण्यात आल्या. मात्र, त्या पुरेशा नाहीत. भाविकांची वाढती संख्या बघता येथे सभागृह, स्वच्छतागृह आणि पाणी व्यवस्था गरज आहे. या सुविधा नसल्याने भाविकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय. वढा गाव नदीकाठावरीत टेकडीवर वसलेले आहे. आजपर्यंत गावात कधीही पूर आला नाही, हा विठ्ठल-रुक्माईचा आशीर्वाद आहे, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.