हनुमानाच्या मूर्तीने स्वप्नात दिला दृष्टांत; वर्ध्यातील 'या' मंदिराचा पाहा इतिहास PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
बाल हनुमानाच्या रूपात विराजमान असलेली ही मूर्ती मंदिरात स्थापन होण्या आधीचा इतिहासही रंजक आहे.
वर्धा आर्वी मार्गावर असलेल्या सुकळी बाई येथे संकट मोचन हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराला जवळजवळ 100 वर्षांचा इतिहास आहे. बाल हनुमानाच्या रूपात विराजमान असलेली ही मूर्ती मंदिरात स्थापन होण्या आधीचा इतिहासही रंजक आहे. मंदिरामागून जाणाऱ्या वर्धा नदीचा देखील रंजक आख्यायिकेशी संबंध आहे. आजच्या काळात या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली आहे. दूरवरून भक्त याठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात. काय आहे या प्रसिद्ध हनुमान मंदिराचा इतिहास जाणून घेऊयात.
advertisement
आंजी येथील संत महादेव बाबा हे ब्रह्मचारी होते. एकदा महाराजांच्या स्वप्नात जवळच असलेल्या जामणी येथील एका झाडाखाली असलेल्या हनुमानाच्या मूर्तीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि या ठिकाणी घेऊन जा असे म्हटले. त्यानंतर महाराजांनी ते ठिकाण गाठून मूर्तीला खांद्यावर उचलून सुकळी येथील धाम नदीपात्रातील डोहामध्ये टाकले कारण जामनीतील गावकऱ्यांचा आमच्या गावची मूर्ती का नेताय? असे म्हणत विरोध होता.
advertisement
त्यामुळे महाराजांनी डोहात मूर्ती टाकली आणि आता तुम्ही इथून ही मूर्ती काढा असे गावकऱ्यांना म्हटले मात्र गावकऱ्यांकडून ते काही शक्य झाले नाही. त्यानंतर 1925 च्या काळातील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संत श्री महादेव बाबा महाराजांनी डोहातून ती मूर्ती काढली. आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, अशी माहिती मंदिराचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि भक्त गोवर्धन चांडक यांनी दिली.
advertisement
महाराजांना आखाड्याची आवड होती. सुरुवातीला या जागेसाठी नागपूर येथील रघुजी राजे भोसले यांच्याकडे आखाड्यासाठी म्हणून महाराजांनी जमिनीची मागणी केली. भोसले राजे यांनी आखाड्यासाठी जागा दिल्यानंतर खोदकाम करत असताना महाराजांना तिथे एक संतांचा सहा फुटाचा सांगाडा सापडला. ज्या ठिकाणी एक चिमटा एक कमंडलू होता. महाराजांनी तो सांगाडा आणि हे साहित्य सुकळीच्या नदीपात्रात विसर्जित केले आणि त्या ठिकाणी मंदिर परिसरात हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली.
advertisement
सकाळी महाराजांनी छोटसं मंदिर तयार केलं होतं. त्यानंतर वर्धा येथील प्रतिष्ठित गृहस्थ वासुदेवराव सराफ यांनी मंदिराचा विकास काम केले आहे. आताच हे मंदिर चौथ्यांदा विकसित झालेलं मंदिर आहे. दूरवरून या ठिकाणी भाविक आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर येतात. पानग्यांचा स्वयंपाक करतात, अशी माहितीही गोवर्धन चांडक यांनी दिली.
advertisement
कालांतराने मंदिरात हनुमानाच्या मूर्तीसह प्रभू श्रीराम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, गणपती मंदिर आणि महादेवाची पिंड देखील स्थापन करण्यात आली आहे. याठिकाणी येणारे भक्त मनोकामना पूर्ण झाल्यानंतर विशेषतः पानगे आणि वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद करतात. मंदिर परिसरात पूजेच्या साहित्याची दुकाने आणि खाद्यपदार्थांची दुकाने, तसेच पिण्याच्या पाण्याची आणि पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
advertisement