Mahashivratri 2026: अर्जुनाचा तो बाण अन् बाणेरचा उगम! पुण्यातील पांडवकालीन बाणेश्वर मंदिराचा रंजक इतिहास
- Published by:Kiran Pharate
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पांडव येथे वास्तव्यास असताना अर्जुनाने जमिनीत बाण मारला आणि त्या ठिकाणी गंगेचा अवतार झाला, असे मानले जाते. याच बाण या शब्दावरून या परिसराला बाणेर आणि मंदिराला बाणेश्वर हे नाव पडल्याचे सांगितले जाते.
पुणे : पुणे शहर हे केवळ शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणूनच नव्हे, तर प्राचीन इतिहास आणि धार्मिक वारसा जपणारे शहर म्हणूनही ओळखले जाते. शहरात अनेक जुने वाडे, ऐतिहासिक वास्तू आणि प्राचीन मंदिरे आजही उभी आहेत. त्यामध्येच पुण्याच्या बाणेर परिसरात वसलेले पांडवकालीन बाणेश्वर मंदिर हे एक महत्त्वाचे आणि श्रद्धेचे केंद्र मानले जाते. स्वयंभू शिवलिंग, पांडवांशी जोडलेल्या आख्यायिका आणि निसर्गरम्य परिसर यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मंदिराच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाची कथा म्हणजे जल कुंडाची आख्यायिका. मंदिर परिसरात असलेल्या जल कुंडात बाराही महिने पाणी असते. पांडव येथे वास्तव्यास असताना अर्जुनाने जमिनीत बाण मारला आणि त्या ठिकाणी गंगेचा अवतार झाला, असे मानले जाते. याच बाण या शब्दावरून या परिसराला बाणेर आणि मंदिराला बाणेश्वर हे नाव पडल्याचे सांगितले जाते.
advertisement
बाणेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित असून येथे पूर्वी स्वयंभू शिवलिंग होते. काळाच्या ओघात हे शिवलिंग भंगले होते. त्यानंतर 2008 साली नवीन शिवलिंगाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आजही हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. मंदिराची रचना साधी असली तरी ती प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्यशैलीचे उदाहरण मानली जाते. काळ्या पाषाणात बांधलेले हे मंदिर आजही भक्कम स्थितीत उभे आहे.
advertisement
इतिहासकारांच्या मते, मूळ मंदिर पांडवकालीन असले तरी पेशवेकालात मंदिराची डागडुजी आणि विस्तार करण्यात आला. त्यामुळे मंदिरावर विविध कालखंडांचा ठसा दिसून येतो. पेशव्यांच्या काळात हे मंदिर धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि यात्रांसाठी महत्त्वाचे केंद्र होते.
आज मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. मंदिर वर्षभर भाविकांसाठी खुले असते. दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी भजन, मिरवणूक, अभिषेक तसेच शिव-पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या काळात मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
advertisement
पुण्याच्या वाढत्या शहरीकरणातही बाणेश्वर मंदिराने आपली शांतता, निसर्गसौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरण टिकवून ठेवले आहे. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा अनोखा संगम असलेले बाणेश्वर मंदिर हे पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक मानले जाते, असे मत मंदिराचे विश्वस्त संदीप वाडकर यांनी व्यक्त केले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 2:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mahashivratri 2026: अर्जुनाचा तो बाण अन् बाणेरचा उगम! पुण्यातील पांडवकालीन बाणेश्वर मंदिराचा रंजक इतिहास






