'थर्टी फर्स्ट'चा दिवस ठरला शेवटचा; नवीन वर्षाची सकाळ पाहिलीच नाही, रस्त्यातच मायलेकाचा हृदयद्रावक शेवट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
कासुर्डी गावच्या हद्दीत ते रस्त्याच्या कडेला उभे असताना, भोरकडून अत्यंत वेगाने एक कार आली. या कारने त्यांच्या दुचाकीला अक्षरशः उडवलं.
पुणे: भोर तालुक्यातील तेलवडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भोर-कापूरहोळ रस्त्यावरील कासुर्डी फाट्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात माय-लेकाचा दुर्दैवी अंत झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदा लक्ष्मण धावले (वय ५५) आणि त्यांचा मुलगा अमृत लक्ष्मण धावले (वय २७) हे दोघे बुधवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून शेताकडे जाण्यासाठी घरून निघाले होते. कासुर्डी गावच्या हद्दीत ते रस्त्याच्या कडेला उभे असताना, भोरकडून अत्यंत वेगाने एक कार आली. या कारने त्यांच्या दुचाकीला अक्षरशः उडवलं. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही गंभीर जखमी झाले.
advertisement
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी माय-लेकाला तातडीने खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शेतात निघालेल्या माय-लेकाचा असा अचानक मृत्यू झाल्याने तेलवडी गावासह संपूर्ण भोर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
याप्रकरणी राजगड पोलिसांनी कारचालक स्वप्नील सुनील पठारे याला ताब्यात घेतले आहे. संतोष रामचंद्र धावले यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे गाडी चालवून दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अपघात झाला त्यावेळी कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असंही समोर येत आहे. नव्या वर्षाच्या स्वागतापूर्वीच या मायलेकाने जगाचा निरोप घेतल्यानं गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 6:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'थर्टी फर्स्ट'चा दिवस ठरला शेवटचा; नवीन वर्षाची सकाळ पाहिलीच नाही, रस्त्यातच मायलेकाचा हृदयद्रावक शेवट









