तो केरळचा; बँकॉकहून पुण्याला आला; विमानतळावर उतरताच चेहरा बघून संशय, अन् तपासणीत धक्कादायक कांड उघड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शुक्रवारी बँकॉकहून पुण्यात विमान उतरल्यानंतर संबंधित प्रवासी पुणे विमानतळावर उतरला. 'चेक-इन बॅगेज'ची एक्सरे मशीनद्वारे कसून तपासणी होते, हे ठाऊक असल्याने त्याने एक वेगळीच शक्कल लढवली होती.
पुणे : पुणे विमानतळावर पुन्हा एकदा सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई केली. यात एका प्रवाशाकडून सुमारे ३३ लाख ६० हजार रुपये किमतीचा उच्च दर्जाचा गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त केला आहे. याप्रकरणी केरळ राज्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने पुण्यात दाखल झाला होता.
असा उघड झाला तस्करीचा डाव
शुक्रवारी बँकॉकहून पुण्यात विमान उतरल्यानंतर संबंधित प्रवासी पुणे विमानतळावर उतरला. 'चेक-इन बॅगेज'ची एक्सरे मशीनद्वारे कसून तपासणी होते, हे ठाऊक असल्याने त्याने एक वेगळीच शक्कल लढवली होती. त्याने गांजाची पाकिटे मुख्य बॅगेत न ठेवता आपल्या हॅन्डबॅगमध्ये लपवली होती. मात्र, विमानतळावर उतरल्यानंतर एरोब्रिजमधून बाहेर पडताना या प्रवाशाच्या चेहऱ्यावर प्रचंड दडपण आणि भीती दिसून आली. त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून तेथे तैनात असलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून चौकशी केली.
advertisement
अधिकार्यांनी प्रवाशाची हॅन्डबॅग तपासली असता, त्यात दोन पाकिटांमध्ये लपवून ठेवलेला ९६० ग्रॅम वजनाचा 'हायड्रोपोनिक वीड' सापडला. दोन पारदर्शक व्हॅक्यूम सीलबंद पॅकेट्समध्ये हा गांजा लपवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत ३३ लाखांहून अधिक आहे. हा अमली पदार्थ जप्त करून प्रवाशाला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून सोन्याची तस्करी रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात असतानाच, आता अमली पदार्थांची ही मोठी खेप पकडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कोठे जोडलेले आहेत, याचा अधिक तपास सीमा शुल्क विभाग करत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 9:18 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
तो केरळचा; बँकॉकहून पुण्याला आला; विमानतळावर उतरताच चेहरा बघून संशय, अन् तपासणीत धक्कादायक कांड उघड









