शाळेत नाव, जन्मतारीख चुकली, नो टेन्शन! आता दुरुस्ती करता येणार, कुठे आणि कसा करायचा अर्ज?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Name Change: शाळेतील नाव आणि जन्मतारीख चुकल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, आता शाळेतील रेकॉर्डवर दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
पुणे : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे शालेय रेकॉर्ड. नाव, आडनाव, पालकांची नावे किंवा जन्मतारीख या तपशिलांमध्ये अगदी छोटी चूक भविष्यात अनेक अडचणी निर्माण करू शकते. प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक प्रश्न, बोर्ड परीक्षेच्या फॉर्ममध्ये विसंगती, सरकारी कागदपत्रांमधील तफावत किंवा पासपोर्टसारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. अशा चुका टाळण्यासाठी शिक्षण विभागाने पहिली ते दहावीपर्यंत रेकॉर्ड दुरुस्तीची अधिकृत प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.
या शैक्षणिक वर्षात पुणे जिल्ह्यातील जवळपास 700 विद्यार्थ्यांनी आपल्या नाव, आडनाव, स्पेलिंग किंवा जन्मतारखेमधील चुका सुधारण्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. बहुतेक प्रकरणे प्राथमिक शाळांमधील असून ती पालकांकडून दिलेल्या तपशिलातील तफावत आणि नोंदणीतील लेखनचूक यामुळे झाल्याचे समोर आले आहे.
advertisement
रेकॉर्डमध्ये चुका होण्याची प्रमुख कारणे
शाळेत प्रवेश घेताना पालकांकडून दिलेली माहिती आणि जन्मदाखल्यातील तपशील यात विसंगती असणे ही सर्वात मोठी समस्या आहे. अनेकदा नावे इंग्रजीत आणि मराठीत लिहिताना स्पेलिंगमध्ये फरक पडतो. काही वेळा शैक्षणिक नोंदणी ऑनलाईन करताना तांत्रिक त्रुटी होतात. म्हणूनच शाळांनी आणि पालकांनी प्रवेशाच्या वेळी दिलेल्या माहितीची तपासणी अत्यंत काळजीपूर्वक करावी, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे.
advertisement
दुरुस्तीची अधिकृत प्रक्रिया कशी?
काहीही त्रुटी आढळल्यास पालकांनी सर्वप्रथम शाळेकडे लेखी अर्ज सादर करावा. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक असते:
विद्यार्थ्याचा जन्मदाखला
पालकांचे ओळखपत्र (आधारकार्ड/पॅन/इतर)
शालेय रेकॉर्डची प्रत
दुरुस्ती करावयाच्या तपशीलांची माहिती
शाळेचा प्रस्ताव
मुख्याध्यापक संबंधित नोंदींची पडताळणी करून प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवतात. प्राथमिक शाळांमधील बदलांना गटशिक्षणाधिकारी तर माध्यमिक स्तरावरील बदलांना उपशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी मंजुरी देतात. मंजुरी मिळाल्यावर शाळा अधिकृतपणे रेकॉर्डमध्ये सुधारणा नोंदवते.
advertisement
दहावीनंतर बदल करणे शक्य
एसएससी बोर्डाचे गुणपत्रक हे कायदेशीरदृष्ट्या अंतिम रेकॉर्ड मानले जाते. म्हणजेच दहावीत विद्यार्थ्याचे नाव, आडनाव किंवा जन्मतारीख जशी नोंदवली जाते, ती नंतर जवळपास सर्व सरकारी कागदपत्रांसाठी आधार ठरते. तरीही दहावीनंतरही बदल करण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे, मात्र ती अधिक गुंतागुंतीची आहे.
नाव किंवा जन्मतारखेतील बदलासाठी:
अॅफिडेव्हिट तयार करणे.
सरकारी राजपत्रात (Gazette) नाव/तपशील जाहीर करणे.
advertisement
त्यानंतर बोर्ड, कॉलेज किंवा संबंधित सरकारी कार्यालयांकडे स्वतंत्र अर्ज करणे.
शिक्षण विभागाने पालकांना प्रवेश प्रक्रिया आणि नोंदणी करताना पूर्ण काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. लहानशा चुकांमुळे मुलांच्या भविष्यात अनावश्यक अडथळे निर्माण होऊ शकतात. वेळेत दुरुस्ती करून घेतल्यास सर्व शैक्षणिक आणि सरकारी प्रक्रियेत सुसूत्रता राहते. त्यामुळे होणारा त्रास आणि अडचणी टाळता येऊ शकतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 20, 2025 8:58 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
शाळेत नाव, जन्मतारीख चुकली, नो टेन्शन! आता दुरुस्ती करता येणार, कुठे आणि कसा करायचा अर्ज?










