Ganesh Jayanti : माघ चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपतीला आकर्षक सजावट, सुवर्णपाळण्यात साजरा झाला गणेशजन्म सोहळा, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेशजन्म सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने माघ शुद्ध चतुर्थी निमित्त आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेशजन्म सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विनायक अवतार असलेल्या श्रीगणेशाचा जन्मोत्सव यंदाही परंपरेप्रमाणे सुवर्णपाळण्यात दुपारी 12 वाजता पार पडला.
या पावन सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेकाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर गणेशसूक्त अभिषेकही दिवसभर सुरू होता. सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 1.30 ते सायंकाळी 5 या वेळेत गणेशयागाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला.
advertisement
गणेशजन्माच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. यंदा सुमारे 8 ते 10 टन फुलांचा वापर करून सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वापरलेल्या फुलांपासून खतनिर्मिती करण्यात येत असून तेच भाविकांना प्रसाद स्वरूपात वितरित करण्यात येत आहे. पर्यावरणपूरक उपक्रमामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
advertisement
मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी पारंपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला. जन्मक्षणी पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर श्रीगणेशाची मंगल आरती झाली. या क्षणाचा अनुभव घेण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.
सायंकाळी 6 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून नगरप्रदक्षिणा मिरवणूक निघणार असून शहरातील विविध भागातून भाविक या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. गणेशजन्माच्या दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. भाविकांनी दिवसभर सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 3:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ganesh Jayanti : माघ चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपतीला आकर्षक सजावट, सुवर्णपाळण्यात साजरा झाला गणेशजन्म सोहळा, Video








