इस्त्राईल-इराण संघर्षामुळे पुण्यातले उद्योग-हॉटेल भरडणार! कमर्शियल गॅस सिलिंडरबाबत मोठी बातमी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण येथील गॅस प्लांटमधून जिल्ह्यातील सर्व डीलर्सना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन कमर्शियल सिलेंडरच्या ऑर्डर्स घेऊ नका, असे आदेश कंपन्यांनी दिल्याने व्यावसायिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
(अभिजित पोते, प्रतिनिधी) पुणे : मध्यपूर्वेतील इस्त्राईल आणि इराण यांच्यात पेटलेल्या युद्धाची धग आता भारतापर्यंत पोहोचली आहे. या आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतींनी उसळी घेतली आहे. त्याचा थेट फटका भारताला बसला आहे. विशेषतः देशातील गॅस पुरवठ्यावर याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, सरकारी तेल कंपन्या असलेल्या BPCL (भारत पेट्रोलियम) आणि HPCL (हिंदुस्तान पेट्रोलियम) ने मोठी पावले उचलली आहेत. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण येथील गॅस प्लांटमधून जिल्ह्यातील सर्व डीलर्सना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन कमर्शियल सिलेंडरच्या ऑर्डर्स घेऊ नका, असे आदेश कंपन्यांनी दिल्याने व्यावसायिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. व्यवसायिक वापराचा सिलेंडर ५ , १९ , ३५ , ४७ आणि ४२७ किलो अशा वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध असतो. हॉटेल्स आणि इतर व्यवसायिक कारणांसाठी त्याचा वापर केला जातो. डीलर्सनी व्यावसायिक वापराच्या सिलेंडर्ससाठी गाड्या पाठवू नयेत अशा सुचना त्यांना देण्यात आल्यात.
advertisement
हॉटेल आणि उद्योगांवर गदा
या निर्णयाचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिक, कॅन्टीन आणि लघु उद्योगांना बसणार आहे. ऐन सुटीच्या आणि लग्नसराईच्या दिवसांत गॅस सिलेंडरच्या नवीन ऑर्डर्स बंद झाल्याने व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. पुरवठ्यात व्यत्यय आल्यास हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारताला फटका आणि चिंता
इस्त्राईल-इराण संघर्षाचा भारताला मोठा फटका बसला असून, आयात महागल्याने गॅस वितरणाची साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जर परिस्थिती लवकर निवळली नाही, तर घरगुती गॅस पुरवठ्यावरही याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगामी काळात इंधन आणि गॅसच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सामान्य पुणेकर आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 11:06 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
इस्त्राईल-इराण संघर्षामुळे पुण्यातले उद्योग-हॉटेल भरडणार! कमर्शियल गॅस सिलिंडरबाबत मोठी बातमी








