'चावी गाडीच्या टायरखाली अन्..'; दरीत उडी घेण्याआधी पुण्यातील आयटी अभियंत्याचा पत्नीला काय होता शेवटचा मेसेज?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
हा मेसेज वाचताच हादरलेल्या पत्नी रिया आणि त्यांच्या मित्रांनी तातडीने लोणावळ्याकडे धाव घेतली. तिथे त्यांना विरेंद्र यांची निळ्या रंगाची कार उभी असल्याचे दिसले
लोणावळा: पुण्यातील एका ३३ वर्षीय आयटी अभियंत्याने लोणावळ्यातील लायन्स पॉइंट येथे दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नीसाठी पाठवलेला शेवटचा मेसेज आणि कंपनीला केलेला ई-मेल आता या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तो शेवटचा मेसेज आणि शोध
मूळचे नागपूरचे असलेले विरेंद्र वाल्मीकी सिन्हा (वय ३३, रा. कासारसाई) हे पुण्याच्या आयटी कंपनीत कार्यरत होते. गुरुवारी पहाटे त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे एका परिचिताच्या मोबाईलवर एक धक्कादायक मेसेज पाठवला. त्या मेसेजमध्ये विरेंद्र यांनी लिहिले होते की, "माझी गाडी टायगर पॉइंट येथे उभी असून, गाडीची चावी टायरखाली ठेवली आहे आणि मोबाईल गाडीतच आहे."
advertisement
हा मेसेज वाचताच हादरलेल्या पत्नी रिया आणि त्यांच्या मित्रांनी तातडीने लोणावळ्याकडे धाव घेतली. तिथे त्यांना विरेंद्र यांची निळ्या रंगाची कार उभी असल्याचे दिसले. गाडीच्या टायरखाली चावी आणि आत मोबाईल होता, मात्र विरेंद्र तिथे नव्हते.
व्हिडिओमध्ये व्यक्त केला छळ
गाडीतील मोबाईल तपासला असता धक्कादायक माहिती समोर आली. विरेंद्र यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते आणि ते कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे पाठवले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करत, त्यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाचा आणि छळाचा पाढा वाचला होता. "काही लोक मला जगू देत नाहीत," अशा वेदना त्यांनी त्या व्हिडिओत मांडल्याचे समजते.
advertisement
५ तासांच्या मोहिमेनंतर मृतदेह सापडला
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग मित्रमंडळ रेस्क्यू टीमच्या मदतीने सुमारे २५० फूट खोल दरीत शोधमोहीम राबवली. ५ तासांच्या अथक परिश्रमानंतर विरेंद्र यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पत्नी रिया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मिलिंद दाणी, सिद्धांत सपकाळ, अभिषेक बिरोले आणि ५ महिलांसह एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, एका उच्चशिक्षित तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 11:15 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'चावी गाडीच्या टायरखाली अन्..'; दरीत उडी घेण्याआधी पुण्यातील आयटी अभियंत्याचा पत्नीला काय होता शेवटचा मेसेज?








