Pune News: खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये भयंकर प्रकार, पाण्यात तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Pune Khadakwasla Dam News: पुण्यातील पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेल्या खडकवासला धरण परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्यातील पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेल्या खडकवासला धरण परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दीपक सपकाळ असं मृत तरुणाचं नाव असून, तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या बॅकवॉटर परिसरात फिरायला आलेल्या काही पर्यटकांना पाण्यात एक मानवी देह तरंगताना दिसला. पर्यटकांनी प्रसंगावधान राखून तातडीने '११२' या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने पाण्यात पोहोत जाऊन मृतदेह बाहेर काढला. यावेळी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले असता, हा मृतदेह दीपक सपकाळ या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झालं. दीपक हा शनिवार संध्याकाळपासून घरातून बेपत्ता होता. तो घरी न परतल्यामुळे चिंतेत असलेल्या त्याच्या कुटुंबीयांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. दुर्दैवाने, दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आला.
advertisement
मृत्यूचे गूढ कायम
दीपकचा मृत्यू हा अपघाती आहे, त्याने आत्महत्या केली आहे की यामागे काही घातपात आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दीपकच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
खडकवासला परिसर हा नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असतो. अशा सार्वजनिक ठिकाणी तरुणाचा मृतदेह आढळल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या नांदेड सिटी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दीपक बेपत्ता झाल्यापासून ते मृतदेह सापडेपर्यंतच्या घटनाक्रम जाणून घेतला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 8:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये भयंकर प्रकार, पाण्यात तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह









