उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? पुण्यातून 450 जादा बस, कोल्हापूर, कोकण अन् कुठं जाणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
ST Bus: पुण्यातील विविध आगारातून राज्यातील विविध ठिकाणांसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत.
पुणे: उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या की पुण्यातून गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे रेल्वे, एसटी बस आणि सर्वच प्रवासी वाहनांना गर्दी वाढते. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातून कोल्हापूरसह कोकण, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवासी जातात. त्यांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी जादा बस चालवण्यात येणार आहेत. 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत 450 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लाखो लोक नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक आहेत. शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच अनेकजण गावी जातात. तर काहीजण पर्यटनाचे नियोजन देखील करत असतात. त्यासाठी महिन्याभरापासूनच रेल्वे, एसटीसह इतर वाहनांचे सीट आरक्षित केले जातात. परंतु, काही वेळा बुकिंग फुल्ल झाल्याने अडचण होते. त्यासाठी एसटीने मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
कुठून कुठे जाणार जादा बस?
पुण्यातील विविध आगारातून राज्यातील विविध ठिकाणांसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट आगारातून ठाणे, बोरिवली, दादर, सोलापूर, कोल्हापूर, कल्याण, पंढरपूर या ठिकाणी बस सोडण्यात येतील.
पुणे स्टेशन आगारातून दादरसाठी बस धावतात. या काळात जादा बस सोडण्यात येईल.
advertisement
शिवाजीनगर आगारातून छत्रपती संभाजीनगरसह नाशिक, लातूर, धुळे, अकोला, सोलापूर, भीमाशंकर, बोरिवली या मार्गावर नियमित बस धावतात. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात जादा बस सोडण्यात येतील.
दरम्यान, दरवर्षी शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर अनेकजण बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. 10 ते 12 एप्रिलपर्यंत या परीक्षा संपतात. यंदा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाले असून 25 एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू राहतील. त्यामुळे त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 3:48 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? पुण्यातून 450 जादा बस, कोल्हापूर, कोकण अन् कुठं जाणार?








