पुणेकरांसाठी गुड न्यूज! 'सिंगल पिलर'वर उभा राहणार भव्य 8 पदरी पूल; पुणे-नाशिक प्रवासाचा कायापालट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एलिव्हेटेड पुलासोबतच खालच्या विद्यमान महामार्गाचे ४ ते ६ पदरी रुंदीकरण केले जाणार आहे. एकूण ३० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे स्थानिक आणि लांब पल्ल्याची वाहतूक पूर्णपणे वेगळी होईल.
पिंपरी-चिंचवड: पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण आणि खेड पट्ट्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर' प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. या ७ हजार ८२७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अदानी इंटरप्राइजेससह तीन मोठ्या कंपन्यांनी यात रस दाखवला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याची चिन्हे आहेत.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (NHAI) राबवण्यात येणारा हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत असणार आहे. हा संपूर्ण ८ पदरी फ्लायओव्हर एकाच खांबावर म्हणजेच सिंगल पिलरवर उभा असेल, ज्यामुळे जमिनीवर कमीत कमी जागा व्यापली जाईल.
एलिव्हेटेड पुलासोबतच खालच्या विद्यमान महामार्गाचे ४ ते ६ पदरी रुंदीकरण केले जाणार आहे. एकूण ३० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे स्थानिक आणि लांब पल्ल्याची वाहतूक पूर्णपणे वेगळी होईल. तसंच भोसरी, मोशी, चाकण आणि खेड यांसारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांशी वेगवान आणि सुरक्षित संपर्क शक्य होईल.
advertisement
कामगार आणि उद्योजकांना मोठा दिलासा
आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. भोसरी ते मोशी दरम्यानच्या भू-संपादनातील अडचणी दूर करण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर चाकण एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या लाखो कामगारांचा तासनतास होणारा खोळंबा थांबणार आहे. "नितीन गडकरींच्या नेतृत्वात हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसराच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल," असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 2:01 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांसाठी गुड न्यूज! 'सिंगल पिलर'वर उभा राहणार भव्य 8 पदरी पूल; पुणे-नाशिक प्रवासाचा कायापालट










