सावधान! गोड बोलून जवळ आली अन् 11 कोटी घेऊन पळाली नैना; पुण्यातील उद्योजकासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका महिलेने आणि तिच्या टोळीने बनावट 'सेबी' (SEBI) प्रमाणपत्र दाखवून उद्योजकाचा विश्वास संपादन केला आणि तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांना गंडा घातला.
पिंपरी-चिंचवड : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली सध्या सायबर भामट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका बड्या उद्योजकाला याचा मोठा फटका बसला आहे. एका महिलेने आणि तिच्या टोळीने बनावट 'सेबी' (SEBI) प्रमाणपत्र दाखवून उद्योजकाचा विश्वास संपादन केला आणि तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांना गंडा घातला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत या वर्षातील ही सर्वात मोठी ऑनलाइन फसवणूक ठरली आहे.
असा रचला 'नैना'ने कट
मिळालेल्या माहितीनुसार, नैना वर्मा आणि प्रोफेसर गोपाल कावेलीरेड्डी नावाच्या व्यक्तींनी काही व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून उद्योजकाशी संपर्क साधला. आपली कंपनी सेबी नोंदणीकृत असल्याचे भासवण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे दाखवली. जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी एका बनावट अॅप आणि लिंकद्वारे उद्योजकाला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. ४ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या अल्प कालावधीत ही मोठी रक्कम उकळण्यात आली.
advertisement
११ कोटींचा अपहार
सुरुवातीला अॅपवर नफा दिसत असल्याने उद्योजकाने मोठी गुंतवणूक केली. मात्र, जेव्हा पैसे काढण्याची वेळ आली, तेव्हा संशयितांनी विविध तांत्रिक कारणे सांगून टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उद्योजकाने पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. नैना वर्मा, गोपाल कावेलीरेड्डी यांच्यासह आठ व्हॉट्सॲप ग्रुप संचालक आणि संबंधित बँक खातेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
तुम्हीही वेळीच सावध व्हा!
या घटनेने उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. "बनावट लिंक, अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि अवाजवी नफ्याचे आमिष दाखवणारे अॅप्स यांच्यापासून सावध राहा," असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. या टोळीने बँक खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम अन्यत्र वळवून अपहार केला असून, पोलीस आता या रॅकेटचा तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 9:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सावधान! गोड बोलून जवळ आली अन् 11 कोटी घेऊन पळाली नैना; पुण्यातील उद्योजकासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं









