पुणेकरांनो जरा जपून! हवेत उडतंय 'जीवघेणं संकट', 3 दिवसात 4 महिलांचा कापला गळा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुलावर अडकलेले तुटलेले पतंग आणि त्यांचे लोंबकळणारे मांजे नागरिकांसाठी 'फास' ठरत आहेत.
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल परिसरात पतंगाच्या जीवघेण्या मांजाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन दिवसांत चार महिला या मांजामुळे जखमी झाल्या आहेत. नवनिर्मित बोपखेल पुलावर ही भयावह परिस्थिती निर्माण झाली असून, एका महिलेच्या गळ्याला गंभीर इजा झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सध्या प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने या अवैध मांजा विक्रीकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिक करत आहेत.
बोपखेल पुलावरून दुचाकीने प्रवास करताना वाऱ्याच्या प्रवाहाने आलेला मांजा अडकून चार महिलांच्या हाताला आणि गळ्याला जखमा झाल्या आहेत. यामध्ये अर्चना पवार नावाच्या महिलेच्या गळ्याला गंभीर कापले गेल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. अवघ्या ७२ तासांत घडलेल्या या मालिका अपघातांमुळे दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
खडकी, दापोडी आणि लगतच्या परिसरात घातक मांजाची सर्रास विक्री सुरू असूनही पोलीस प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप बोपखेलमधील रहिवासी करत आहेत. पोलिसांकडून केवळ पंचनामे केले जातात, मात्र मूळ विक्रेत्यांपर्यंत पोलीस पोहोचत नसल्याने हा धोका वाढला आहे. पुलावर अडकलेले तुटलेले पतंग आणि त्यांचे लोंबकळणारे मांजे नागरिकांसाठी 'फास' ठरत आहेत.
advertisement
प्रतिबंध असूनही हा नायलॉन किंवा चिनी मांजा बाजारात येतोच कसा? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मांजा विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवावी आणि दोषींवर कडक गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बोपखेलमधील संतप्त नागरिकांनी केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 8:13 AM IST









