50 घरं, पोलिसांची फौज आणि रात्र! बुधवार पेठेच्या दलदलीत 'त्या' रात्री काय घडलं? चक्रावून टाकणारी GROUD STORY
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Budhwar Peth Combing Operation: बुधवार पेठेतील कारवाईत काही बांगलादेशी महिला आढळून आल्या. तसेच चार अल्पवयीन मुली सापडल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
पुणे : वेश्याव्यवसायासाठी ओळखला जाणारा पुण्यातील बुधवार पेठ परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुणे पोलीस दलातील फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनानंतर पोलिसांनी बुधवार पेठेत मध्यरात्री धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत 50 हून अधिक घरांची तपासणी करण्यात आली. संपूर्ण परिसरातील प्रत्येक गल्लीबाहेर कडक नाकाबंदी करण्यात आली होती.
या कारवाईचा उद्देश अल्पवयीन मुली, बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी महिला तसेच अमली पदार्थांशी संबंधित प्रकारांवर आळा घालणे हा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तपासणीदरम्यान काही ठिकाणी चौकशी करण्यात आली असता 7 ग्रॅम चरस सापडल्याची माहिती पुढे आली. तसेच काही बांगलादेशी महिलाही या कारवाईत आढळून आल्या. या प्रकरणात चार अल्पवयीन मुली सापडल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
advertisement
बुधवार पेठेत कार्यरत सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी मात्र या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. बुधवार पेठेत गेली 30 वर्षे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कार्यरत असलेल्या सहेली संस्थेच्या कार्यकारी संचालिका तेजस्वी सेवेकरी यांनी या कारवाईवर आक्षेप नोंदवला.
advertisement
तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, "या भागात पोलीस कारवाया यापूर्वीही झाल्या आहेत आणि नियमबाह्य किंवा अवैध प्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाई होण्याबाबत कोणाचाही आक्षेप नाही. मात्र या वेळी करण्यात आलेली कारवाई चुकीच्या पद्धतीने झाली. अल्पवयीन म्हणून ज्या मुलींना ताब्यात घेण्यात आले, त्या प्रत्यक्षात वेश्याव्यवसायाशी संबंधित नाहीत. त्या आपल्या पालकांसोबत येथे वास्तव्यास असून शाळेत जाणाऱ्या 10 ते 17 वयोगटातील मुली आहेत."
advertisement
गेल्या अनेक वर्षांत पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि जनजागृती मोहिमांमुळे बुधवार पेठेत अल्पवयीन मुलींचे प्रमाण जवळपास नाहीसे झाले आहे. आज अनेक वर्षांपासून येथे अल्पवयीन मुली आढळत नाहीत. त्यामुळे या कारवाईत मुलींना सरसकट उचलून नेणे चुकीचे आहे, असेही सेवेकरी म्हणाल्या.
या भागाचा इतिहास आहे आणि वर्षानुवर्षे चालत आला आहे. 1995 साली येथे सुमारे 5 हजारांहून अधिक महिला कार्यरत होत्या. स्थलांतरित आणि बाहेरून आलेल्या महिलांची संख्या मोठी होती. मात्र सततच्या पोलीस कारवाया, एचआयव्हीसाठी महिलांनाच जबाबदार धरणे आणि सामाजिक दबाव यामुळे ही संख्या हळूहळू कमी होऊन आता सुमारे 2 हजारांपर्यंत आली आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
सततच्या कारवायांमुळे ग्राहक येण्याचे प्रमाण घटते आणि महिलांच्या उपजीविकेवर परिणाम होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक महिलांना बाहेर जाऊन व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे त्यांना गँगरेपसारख्या गंभीर धोक्यांना सामोरे जावे लागते असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर, अल्पवयीन मुलींवर झालेल्या कारवाईविरोधात आपण लवकरच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे तेजस्वी सेवेकरी यांनी सांगितले. महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन व्हावे, यासाठी आम्ही महिला आयोगाकडे दाद मागणार आहोत, असे त्या म्हणाल्या.
advertisement
दरम्यान, पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून कारवाई योग्य पद्धतीनेच झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या आक्षेपांमुळे ही कारवाई पुढील काही दिवस तरी चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 7:15 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
50 घरं, पोलिसांची फौज आणि रात्र! बुधवार पेठेच्या दलदलीत 'त्या' रात्री काय घडलं? चक्रावून टाकणारी GROUD STORY









