तुमचीही विमा कंपनी अशी मनमानी करतीये? पुण्यातील महिलेचा 7 वर्ष कोर्टात लढा, आता मिळणार नवाकोरा आयफोन अन् पैसेही
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
धायरी येथील एका महिलेने कोथरूडमधून ८९ हजार रुपयांना 'आयफोन' खरेदी केला होता. संरक्षणासाठी त्यांनी १५ हजार रुपये भरून विमा घेतला. काही दिवसांतच फोन खाली पडून कॅमेऱ्याचे नुकसान झाले.
पुणे : मोबाईलचा विमा काढल्यानंतर अटी आणि शर्तींचे कारण सांगून ग्राहकाचा दावा फेटाळणे विमा कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. "विम्याचा लाभ एकदाच घेता येतो," हा कंपनीचा दावा फेटाळून लावत पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ग्राहकाला नवीन आयफोन किंवा ८९ हजार रुपये ४ टक्के व्याजासह परत देण्याचा आदेश दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
धायरी येथील एका महिलेने कोथरूडमधून ८९ हजार रुपयांना 'आयफोन एक्स' खरेदी केला होता. संरक्षणासाठी त्यांनी १५ हजार रुपये भरून विमा घेतला. काही दिवसांतच फोन खाली पडून कॅमेऱ्याचे नुकसान झाले. पहिल्यांदा दावा केल्यानंतर कंपनीने फोन बदलून दिला. मात्र, दुसऱ्यांदा फोन खराब झाला असता, कंपनीने "विम्याचा लाभ एकदाच घेता येतो" असे सांगून हात वर केले. याविरोधात संबंधित महिलेने सप्टेंबर २०१८ मध्ये ग्राहक आयोगात धाव घेतली.
advertisement
आयोगाचा 'इफेक्टिव्ह' निकाल
अॅड. श्रीराम करंदीकर यांनी ग्राहकाची बाजू प्रभावीपणे मांडली. आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर आणि सदस्या शुभांगी दुनाखे यांनी या प्रकरणाचे निरीक्षण करताना महत्त्वाचे मुद्दे नोंदवले. यानुसार, केवळ एकदा दुरुस्ती केली किंवा फोन बदलून दिला म्हणजे पॉलिसी संपली, असे म्हणता येणार नाही. तशी लेखी अट विमा पत्रात नव्हती. जर मोबाईलच्या संरक्षणासाठी विमा घेतला असेल, तर तो उद्देश पूर्ण होणे गरजेचे आहे. विमा पॉलिसी एकदाच लागू होते, याचा कोणताही सबळ पुरावा कंपनी सादर करू शकली नाही.
advertisement
सात वर्षांच्या लढ्याला यश
2018 पासून सुरू असलेल्या या लढ्याला अखेर ७ वर्षांनंतर यश आले. न्यायालयाने विमा कंपनीला आदेश दिले आहेत, की एकतर ग्राहकाला नवीन आयफोन द्या किंवा त्याची किंमत (८९,००० रुपये) ४ टक्के व्याजासह परत करा. याशिवाय मानसिक त्रासाची भरपाई आणि तक्रार खर्चापोटी अतिरिक्त १३,००० रुपये देण्याचेही आदेश दिले गेले आहेत
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 12:31 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
तुमचीही विमा कंपनी अशी मनमानी करतीये? पुण्यातील महिलेचा 7 वर्ष कोर्टात लढा, आता मिळणार नवाकोरा आयफोन अन् पैसेही








