अहो खरंच! पुण्यात दिसली चार पायाची कोंबडी, पाहण्यासाठी लागल्या रांगा, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Ajab Gajab: दोन पायाची कोंबडी हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण पुण्यात चक्क चार पायाची कोंबडी आहे. विशेष म्हणजे ही कोंबडी पाहण्यासाठी गर्दी होतेय.
पुणे : पुण्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. अशीच एक घटना शिक्रापूरमध्ये घडली आहे. सिकंदर शेख यांच्या चिकन दुकानात विक्रीसाठी दररोजप्रमाणे आलेल्या बॉयलर जातीच्या पक्ष्यांमध्ये चक्क चार पायांची कोंबडी दिसली. विशेष म्हणजे दुकानदार, स्थानिक नागरिक आणि वन्यजीवप्रेमींनाही ही गोष्ट पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्याने कुतूहलाचं वातावरण आहे. ही चार पायांची कोंबडी पाहण्यासाठी गर्दी होतेय.
सकाळी पक्ष्यांच्या पुरवठ्याची पिशवी उघडताना सिकंदर शेख यांना कोंबडीचे विशेष रूप दिसले. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी कोंबडी पाहिली. चारही पाय स्वतंत्र असून नख्या देखील स्पष्ट दिसतात. तिला कापणे मनाला पटले नाही. त्यामुळे तिला जिवंत ठेवूनच तिच्या संगोपनाचा निर्णय घेतला, असे सिकंदर सांगतात. दुकानदाराचा हा निर्णय ऐकून परिसरातील नागरिक उत्सुकतेने दुकानाबाहेर जमा होत आहेत. अनेकजण कोंबडीचे फोटो व व्हिडिओ काढत असल्याने दुकानासमोर दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
advertisement
या घटनेची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेतील स्वयंसेवकांना मिळताच त्यांनीही दुकानाला भेट दिली. पक्षी संरक्षणाच्या कामात राहून अनेक प्रकार पाहिले, पण चार पायांची कोंबडी मी कधीच पाहिली नव्हती. हे निसर्गातील एक वेगळंच चमत्कारिक रूप वाटलं, असे शेरखान शेख सांगतात.
advertisement
कोंबडीला चार पाय का?
वैद्यकीय दृष्टिकोनातून हा प्रकार पॉलिमेलिया नावाच्या जन्मजात अवस्थेमुळे निर्माण होतो. पॉलिमेलिया ही अतिशय दुर्मिळ जनुकीय स्थिती आहे. यामध्ये भ्रूणाच्या वाढीच्या प्रक्रियेत काही पेशींमध्ये अनियमित विभागणी होते आणि सामान्य दोन पायांऐवजी अतिरिक्त अवयव तयार होतात. माझ्या संपूर्ण सेवेत मी असे प्रकरण कधीच पाहिले नव्हते, असे सेवानिवृत्त सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.
advertisement
कोंबडी दोन पायांवर चालते
चारही पाय पूर्ण विकसित असून नख्यांपासून सांध्यांपर्यंत सर्व अंग व्यवस्थित असले तरी स्वतंत्रपणे ओळखू येतात. कोंबडी चालताना दोन पायच जास्त वापरत असली तरी, अतिरिक्त पाय शरीराच्या बाजूस दिसत असल्याने पाहणाऱ्यांचे नजर हटत नाहीत. गावकऱ्यांच्या मते, ही कोंबडी आता शिक्रापूरमधील आकर्षणाचा बिंदू बनली आहे.
या घटनेमुळे अनेकांचे लक्ष जनुकीय बदलांवर आणि पशुवैद्यकशास्त्रातील या प्रकरणांवर वेधले गेले आहे. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा प्रकार कुतूहलाचा वाटत आहे. सोशल मीडियावरही तिचे फोटो व्हायरल होत असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात गर्दी उसळते.
advertisement
सिकंदर शेख यांनी कोंबडीचे संगोपन करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत. उद्योगाच्या धकाधकीतून थोडंसं थांबून निसर्गाचे विचित्र पण विलक्षण रूप पाहण्याचा हा अनुभव सर्वांसाठी संस्मरणीय ठरत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 20, 2025 1:16 PM IST

