हडपसरमधील तरुणाचा घेतला जीव; मग हरिद्वार गाठून लॉजमध्ये राहिला, पोलिसांकडून 20 महिने शोध, पण अखेर...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
गुन्हा केल्यानंतर वैभव जाधव पुण्याबाहेर पसार झाला होता. पोलीस गेल्या दीड वर्षांपासून अधिक काळ त्याचा माग काढत होते
पुणे: हडपसरमधील एका तरुणाची कालव्यात ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला तब्बल २० महिन्यांच्या मोठ्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी जेरबंद केले आहे. हडपसर पोलिसांनी ही कारवाई उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सापळा रचून केली. वैभव मनोज जाधव (वय २४, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मे २०२४ पासून पोलिसांना गुंगारा देत होता.
नेमकी घटना काय होती?
५ मे २०२४ रोजी हडपसरमधील उन्नतीनगर भागातील कालव्यात विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. दिवा, ठाणे) नावाचा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने त्याला ससून रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही अपघाती घटना वाटली असली तरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. किरकोळ वादातून वैभव जाधवने विनोद शार्दुल यांना कालव्यात ढकलून दिले होते. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
हरिद्वारमध्ये कसा सापडला आरोपी?
गुन्हा केल्यानंतर वैभव जाधव पुण्याबाहेर पसार झाला होता. पोलीस गेल्या दीड वर्षांपासून अधिक काळ त्याचा माग काढत होते. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो उत्तराखंडमधील हरिद्वार येथे एका लॉजमध्ये नाव बदलून राहत असल्याचे निष्पन्न झाले. हडपसर पोलिसांचे एक पथक तातडीने हरिद्वारला रवाना झाले आणि गुरुवारी (२५ डिसेंबर) त्याला ताब्यात घेण्यात आले.
advertisement
परिमंडळ सहाचे उपायुक्त सागर कवडे आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि त्यांच्या टीमने ही धाडसी कारवाई केली. आरोपीला घेऊन पोलीस पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले असून, या हत्येमागील अधिक कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 12:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
हडपसरमधील तरुणाचा घेतला जीव; मग हरिद्वार गाठून लॉजमध्ये राहिला, पोलिसांकडून 20 महिने शोध, पण अखेर...








