पुण्याचा चेहरा-मोहरा बदलणार! 50 घाट, 217 प्रवेशद्वारं अन् बरंच काही... प्रजासत्ताक दिनी पुणेकरांना मिळणार मोठं गिफ्ट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
संगमवाडी ते बंडगार्डन या पट्ट्यातील दीड किलोमीटरचा मार्ग खुला झाल्यामुळे पुणेकरांना विरंगुळ्याचे एक नवीन आणि जागतिक दर्जाचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.
पुणे : पुणे महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प आता प्रत्यक्ष साकारू लागला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुणेकरांसाठी खुला होत आहे. संगमवाडी ते बंडगार्डन या पट्ट्यातील दीड किलोमीटरचा मार्ग खुला झाल्यामुळे पुणेकरांना विरंगुळ्याचे एक नवीन आणि जागतिक दर्जाचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.
पुणेकरांना या प्रकल्पातून नक्की काय मिळणार?
नदीकाठी जॉगिंग आणि सायकलिंगचा आनंद: मुळा-मुठा नद्यांच्या दोन्ही बाजूंना मिळून तब्बल 44 किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक विकसित केला जात आहे. यामुळे पुणेकरांना प्रदूषणापासून दूर निसर्गरम्य वातावरणात फिरता येईल.
५० नवीन विसर्जन आणि फिरण्याचे घाट: विसर्जन सोहळे आणि धार्मिक विधी सुलभ व्हावे यासाठी नदीकाठी ५० नवीन घाट बांधले जात आहेत. बंडगार्डन येथील गणेश घाटाप्रमाणेच इतर ठिकाणीही सुसज्ज सोयी असतील.
advertisement
प्रचंड मोठी बैठक व्यवस्था: मुळा-मुठा संगमाच्या परिसरात खास उतरत्या पायऱ्यांची रचना केली आहे. येथे एकाच वेळी २,००० नागरिक बसू शकतील. विशेष म्हणजे, या पायऱ्यांसाठी उन्हातही गरम न होणाऱ्या खास दगडांचा वापर केला आहे, जेणेकरून कोणत्याही ऋतूत नागरिक तिथे निवांत बसू शकतील.
विद्युत रोषणाई आणि पर्यावरण: प्रकल्पांतर्गत नदीकाठी हजारो देशी वृक्षांची लागवड केली असून, रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे नदीकाठ हा पर्यटनाचा एक मोठा केंद्रबिंदू ठरेल.
advertisement
सहज प्रवेश: संपूर्ण प्रकल्पात मिळून २१७ प्रवेशमार्ग तयार करण्यात आले आहेत, ज्यामुळे शहरातील विविध भागांतील नागरिकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणाहून नदीकाठी सहज पोहोचता येईल.
संगमवाडी ते बंडगार्डन या ३.७ किमीच्या नवव्या टप्प्यापैकी दीड किमीचा भाग सोमवारी (२६ जानेवारी) खुला होत आहे. उर्वरित टप्पा ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. या कामाची पाहणी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी नुकतीच पूर्ण केली असून पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी संगमवाडी रस्त्यावर गतिरोधक आणि सिग्नलची व्यवस्थाही केली जाणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 10:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याचा चेहरा-मोहरा बदलणार! 50 घाट, 217 प्रवेशद्वारं अन् बरंच काही... प्रजासत्ताक दिनी पुणेकरांना मिळणार मोठं गिफ्ट









