पुणेकरांनो आता घरातही सावधच बसा! भरधाव डंपर काळ बनून घरात घुसला, महिलेचा जागीच मृत्यू
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने डंपर थेट रस्त्याशेजारी असलेल्या घरात घुसला. धडक इतकी जोरदार होती की घराची एक बाजू पूर्णपणे जमीनदोस्त झाली.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील कातरखडक गावात एका भीषण अपघाताने शोककळा पसरली आहे. वळणावर डंपरचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाळूने भरलेला हा डंपर रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात शिरला. या भीषण धडकेत घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर दुसरी एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
नेमकी घटना काय?
मुळशी तालुक्यात सध्या वर्तुळाकार मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी वाळू घेऊन निघालेला एक भरधाव डंपर २० तारखेला कातरखडक गावातील वळणावरून जात होता. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने डंपर थेट रस्त्याशेजारी असलेल्या घरात घुसला. धडक इतकी जोरदार होती की घराची एक बाजू पूर्णपणे जमीनदोस्त झाली.
advertisement
ढिगाऱ्याखाली गाडले गेले आयुष्य
अपघातावेळी नंदा मालपोटे (वय ५०) या घरातच होत्या. भिंत कोसळल्याने त्या राडारोड्याखाली अडकल्या. या घटनेमुळे परिसरात एकच कल्लोळ उडाला. ग्रामस्थांनी आणि पौड पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नंदा मालपोटे आणि अन्य एका महिलेला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच नंदा मालपोटे यांचा मृत्यू झाला होता.
advertisement
डंपरचालकावर गुन्हा दाखल
याप्रकरणी नंदा मालपोटे यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पौड पोलीस ठाण्यात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे आणि बेदरकारपणामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 9:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो आता घरातही सावधच बसा! भरधाव डंपर काळ बनून घरात घुसला, महिलेचा जागीच मृत्यू








