Pune Rain: दोन तासांच्या पावसाने शहर का तुंबतं? पुणेकर संतापले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुसळधार पावसाने पुणे शहर अक्षरशः ठप्प झालं होतं. फक्त दोन तासांच्या पावसाने अनेक वर्षांचे विक्रम मोडले.
पुणे : पुणे शहर पुन्हा एकदा गुरुवारी झालेल्या पावसात तुंबलं. दोन तासांच्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर ठप्प झाले होते. रस्त्यांवर गुडघाभर पाणी… घरात पाणी… आणि आता नागरिक थेट ओढ्यात उतरून आंदोलन करतायत… प्रश्न एकच पुणे का तुंबतंय?
पुण्यातील कोथरूडमध्ये नागरिकांचा संताप आता उफाळून आलाय. ओढे-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलून बांधकाम केलं जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. डीपी रस्त्यासाठी नाले बुजवले जात आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे पावसाचं पाणी थेट रस्त्यावर. याच्या निषेधार्थ कोथरूडकर थेट ओढ्यात उतरले… “आमचा जीव घेतल्यावरच प्रशासन जागं होणार का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
advertisement
संसार उघड्यावर
गुरूवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुणे शहर अक्षरशः ठप्प झालं होतं. फक्त दोन तासांच्या पावसाने अनेक वर्षांचे विक्रम मोडले. शहरातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं. वाहनांचं मोठं नुकसान झालं आणि अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झाल पुण्यातील जनता वसाहतीत परिस्थिती आणखी गंभीर आहे. अनेक घरांच्या भिंती पावसामुळे कोसळल्या. काहींच्या घरात पाणी शिरलं. तर काहींचा संसार अक्षरशः उघड्यावर आला. नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासनाची कोणतीही मदत पोहोचलेली नाही
advertisement
दोन तासांच्या पावसाने शहर का तुंबतं?
या सगळ्या परिस्थितीवर बोलताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी बैठकघेऊन अधिकाऱ्यांना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या. ड्रेनेजची सफाई, नाले मोकळे करणं आणि झाडांच्या फांद्या छाटण्याचे आदेश देण्यात आलेत. आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील काही ठिकाणी दुर्लक्ष झाल्याची कबुली दिलीय. दोन तासांच्या पावसाने शहर का तुंबतं? नाले-ओढे बुजवणं, अनियंत्रित बांधकाम, आणि अपुरी ड्रेनेज व्यवस्था यामुळे दरवर्षी हा त्रास सहन करायचा का? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेत. मात्र या प्रश्नांची थेट उत्तरं काही मिळताना दिसत नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 10:24 PM IST








