ना अपघाताची भीती, ना ट्रॅफिक जामचं टेन्शन, पुणे ते कोकण सुसाट, ताम्हिणी घाटात होतोय गेमचेंजर प्लॅन
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: ताम्हिणी घाटात मोठ्या प्रमाणात प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामधून लवकरच सुटका होणार असून ताम्हिणी घाटरस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
पुणे : कोकण आणि पुण्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात वाहतूक कोंडीची समस्या कायमचीच आहे. अरुंद रस्ते आणि नागमोडी वळणांमुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण देखील जास्त आहे. मात्र आता या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुणे ते कोकण प्रवास अधिक सोपा होणार आहे.
ताम्हिणी घाटाला पर्यायी रस्ता किंवा बोगद्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, हा मार्ग तयार झाल्यास दिघी बंदर आणि माणगाव औद्योगिक क्षेत्राचा पुण्याशी संपर्क अधिक जलद आणि सोयीचा होणार आहे.
advertisement
दिघी पोर्टसाठी मार्ग होणार उपलब्ध
रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्टकडे जाण्यासाठी पुणे – चांदणी चौक – पौड – ताम्हिणी – माणगाव – दिघी असा मार्ग वापरला जातो. पुणे ते दिघी पोर्ट या मार्गाला केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. मात्र ताम्हिणी घाटात मोठी चढ-उतार आणि अनेक वळणे असल्यामुळे प्रवासाला अधिक वेळ लागतो. विशेषतः जड वाहनांसाठी हा मार्ग काहीसा कठीण ठरतो.
advertisement
दिघी पोर्टकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रुंद आणि सुरक्षित रस्ता आवश्यक असल्याने ताम्हिणी घाटाला पर्यायी मार्गाचा पर्याय पुढे आला आहे. या पर्यायी मार्गामुळे पुण्याहून कोकणात जाणे अधिक जलद आणि सोयीचे होणार आहे. तसेच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रालाही याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे.
प्रवास सुलभ करण्यासाठी दोन मार्गांचा विचार
ताम्हिणी घाटातील अडचणी लक्षात घेता दोन पर्याय समोर आले आहेत. पहिला पर्याय म्हणजे ताम्हिणी घाट टाळून पानशेतमार्गे माणगाव–दिघी पोर्ट असा नवीन रस्ता तयार करणे. तर दुसरा पर्याय म्हणजे सध्याचा घाटरस्ता रुंद करणे, धोकादायक वळणे कमी करणे आणि डोंगरवाडी ते ताम्हिणी दरम्यान बोगदा उभारणे.
advertisement
दरम्यान, घाटातील अंतर कमी करून प्रवास अधिक सोपा आणि जलद करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी आवश्यक प्राथमिक माहिती गोळा करण्यासोबतच नवीन मार्गाची रूपरेषा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 10:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
ना अपघाताची भीती, ना ट्रॅफिक जामचं टेन्शन, पुणे ते कोकण सुसाट, ताम्हिणी घाटात होतोय गेमचेंजर प्लॅन









