टेन्शन वाढवणारी बातमी! पुणेकरांच्या नावे नको तो विक्रम; जगात पाचवा नंबर, धक्कादायक अहवाल
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. पुणेकरांचा वर्षभरात सुमारे 152 तास वेळ वाहतूक कोंडीत जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुणे: विद्येचं माहेरघर, औद्योगिक नगरी आणि आयटी हब म्हणून ओळख असलेले पुणे शहर गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित होत आहे. मात्र, या वेगवान विकासासोबतच अनेक गंभीर समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठी समस्या म्हणजे पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी. याच समस्येमुळे पुणे शहर पुन्हा एकदा जागतिक पटलावर चर्चेत आले आहे. मुंबईपेक्षा पुण्यात वाहतूक कोंडी अधिक असल्याचे समोर आले असून, वाहतूक कोंडीच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर असलेले पुणे शहर 2025 मध्ये आता पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे.
जगभरातील 492 शहरांचा अहवालात अभ्यास
पुण्यासह जगभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी बनली आहे. अवघ्या 15 मिनिटांच्या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे तासाभराहून अधिक वेळ लागत आहे. याच पार्श्वभूमीवर टॉमटॉम या संस्थेने ट्रॅफिक इंडेक्स 2025 हा अहवाल जाहीर केला आहे. वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन जगभरातील 492 शहरांमधील वाहतुकीची माहिती गोळा करण्यात आली होती. वाहतुकीच्या जीपीएस डेटाच्या आधारे सखोल अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
advertisement
या अहवालानुसार देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या पहिल्या दहामध्ये बंगळुरू आणि पुणे या दोन शहरांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. तसेच, जगभरातील 492 शहरांपैकी पहिल्या 50 क्रमांकांमध्ये भारतातील हैदराबाद, मुंबई, चेन्नई, जयपूर, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि बंगळुरू या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
advertisement
वाहतूक कोंडीमध्ये अनेक शहरांची परिस्थिती गंभीर
देशातील अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. पुणे शहर वाहतूक कोंडीच्या बाबतीत 2022 मध्ये सातव्या, 2023 मध्ये सहाव्या तर 2024 मध्ये चौथ्या स्थानावर होते. 2025 मध्ये पुण्यात वाहतूक कोंडीत थोडी सुधारणा झाल्याने शहर चौथ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आले आहे.
पुण्यात सरासरी 15 मिनिटांत साडेचार किलोमीटर अंतर पार होत असल्याची नोंद आहे. तसेच वर्षभरात सुमारे 152 तास पुणेकरांचा वेळ वाहतूक कोंडीत जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगातील वाहतूक कोंडीच्या यादीत बंगळुरू दुसऱ्या, तर मुंबई 18 व्या क्रमांकावर आहे. मेक्सिको सिटी हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर ठरले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 12:37 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
टेन्शन वाढवणारी बातमी! पुणेकरांच्या नावे नको तो विक्रम; जगात पाचवा नंबर, धक्कादायक अहवाल







