Railway Update: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, पुणे- नागपूर दरम्यान विकेंड स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Railway Update: साप्ताहिक सुट्ट्या आणि प्रजासत्ताक दिन सलग आल्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे: लागोपाठ येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेक गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होत आहे. यामुळे आरक्षण न मिळालेल्या तसेच सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि नागपूरदरम्यान विशेष शुल्कासह विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाडीमुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.
advertisement
पुणे–नागपूरदरम्यान विशेष रेल्वे फेरी
शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि प्रजासत्ताक दिन सलग आल्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्र. 01467 आणि 01468 पुणे–नागपूर–पुणे विशेष गाडीची प्रत्येकी एक फेरी चालविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 01467 पुणे–नागपूर विशेष गाडी 23 जानेवारीला दुपारी 3.50 वाजता पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूर येथे पोहोचेल. तर गाडी क्र. 01468 नागपूर–पुणे विशेष गाडी 24 जानेवारीला सकाळी 8 वाजता नागपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पुणे येथे पोहोचेल.
advertisement
या स्थानकाचा समावेश
या विशेष रेल्वेगाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीत दोन वातानुकूलित 2-टायर, चार वातानुकूलित 3-टायर, आठ स्लीपर डबे, चार सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, एक जनरेटर व्हॅन तसेच एक गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 1:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Railway Update: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, पुणे- नागपूर दरम्यान विकेंड स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक









