Pune Crime: पार्टीत सनमचा मृत्यू; शरीरात निघालं पुरुषाचं हृदय; 17 जणांची DNA टेस्ट, पुण्यातील हे थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
रिपोर्टमध्ये नमूद होते की, सनमच्या शरीरात जे हृदय आहे ते एका पुरुषाचे असून ते ७० टक्के ब्लॉक होते. ही बाब सनमच्या पालकांना पचनी पडण्यासारखी नव्हती, कारण सनम एक फुटबॉल खेळाडू होती आणि ती पूर्णपणे तंदुरुस्त होती.
पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते. एका १९ वर्षांच्या तरुणीचा वाढदिवसाच्या रात्री मृत्यू होतो आणि त्यानंतर सुरू होतो असा एक तपास, जो पाहून सीबीआयचे अधिकारीही चक्रावून गेले. या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सनमच्या शरीरात चक्क एका 'पुरुषाचे हृदय' आढळले होते.
वाढदिवसाची ती 'काळरात्र'
मूळची मुंबईची असलेली सनम हसन पुण्यात फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेत होती. ३ ऑक्टोबर २०१२ रोजी तिचा वाढदिवस होता. मित्रांनी आग्रह केला, वडिलांनी 'नाईट आऊट'ची परवानगी दिली आणि पुण्याच्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये पार्टी सुरू झाली. मात्र, ४ ऑक्टोबरच्या पहाटे सनमच्या घरी फोन गेला की तिची तब्येत खराब आहे. पालकांनी पुण्यात धाव घेतली, तोपर्यंत त्यांच्या काळजाचा तुकडा या जगातून निघून गेला होता.
advertisement
पोस्टमॉर्टममध्ये विज्ञानालाही थक्क करणारा रिपोर्ट
ससून रुग्णालयात सनमचे पोस्टमॉर्टम झाले आणि तिथूनच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. रिपोर्टमध्ये नमूद होते की, सनमच्या शरीरात जे हृदय आहे ते एका पुरुषाचे असून ते ७० टक्के ब्लॉक होते. ही बाब सनमच्या पालकांना पचनी पडण्यासारखी नव्हती, कारण सनम एक फुटबॉल खेळाडू होती आणि ती पूर्णपणे तंदुरुस्त होती. मग एका तरुण मुलीच्या शरीरात मुलाचे हृदय आले कुठून? असा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
advertisement
बलात्कार की घातपात?
सनमच्या शरीरावर सीमेनचे नमुने आणि चार इंजेक्शनच्या खुणा आढळल्या होत्या, ज्यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा दाट संशय निर्माण झाला. पार्टीत हजर असलेल्या १७ जणांची डीएनए चाचणी करण्यात आली, मात्र कोणाचेही नमुने मॅच झाले नाहीत. तपासात पुढे असे सांगितले गेले की, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हृदयांची अदलाबदल झाली असावी. पण पुरावा म्हणून दिलेले ते हृदय नेमके कोणाचे होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
सीबीआयलाही आले अपयश
२०१४ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. २०१६ मध्ये तिचा मृतदेह पुन्हा थडग्यातून बाहेर काढून तपासणी करण्यात आली. मात्र, वेळेत पुरावे गोळा न केल्याने आणि फॉरेन्सिक पुराव्यांशी झालेल्या छेडछाडीमुळे सीबीआयलाही ठोस काही सापडले नाही. आज १० वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, सनम हसनचा मृत्यू एक नैसर्गिक 'हार्ट अटॅक' होता की सुनियोजित 'मर्डर मिस्ट्री', हे गुपित आजही कायम आहे. ही जर हत्या असेल तर आरोपी अजूनही पकडला गेला नाहीये.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 11:01 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पार्टीत सनमचा मृत्यू; शरीरात निघालं पुरुषाचं हृदय; 17 जणांची DNA टेस्ट, पुण्यातील हे थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच






