दादर-पुणे प्रवाशांचे हाल; हिरकणीसह शिवशाही बसच्या फेऱ्यांमध्ये 78 टक्क्यांची घट, ST प्रशासनानं दिली 3 अजब कारणं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दादर-पुणे मार्गावर हिरकणीच्या दररोज ४४४ फेऱ्या धावत होत्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये ही संख्या २०५ वर आली आणि आता फेब्रुवारी २०२६ मध्ये केवळ ९७ फेऱ्या उरल्या आहेत.
पुणे : मुंबईतील दादर ते पुणे या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर प्रवास करणाऱ्या एसटी प्रवाशांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. एकेकाळी या मार्गाची शान असलेली 'हिरकणी' बस आता ररस्त्यावरून अदृश्य होऊ लागली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये तब्बल ७८ टक्क्यांनी घट झाली असून, प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.
फेऱ्यांचा घसरता आलेख
दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०२४ मध्ये दादर-पुणे मार्गावर हिरकणीच्या दररोज ४४४ फेऱ्या धावत होत्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये ही संख्या २०५ वर आली आणि आता फेब्रुवारी २०२६ मध्ये केवळ ९७ फेऱ्या उरल्या आहेत. केवळ हिरकणीच नव्हे, तर 'शिवशाही'च्या फेऱ्यांमध्येही एका वर्षात ७९.८ टक्के घट झाली आहे (फेब्रुवारी २०२५ मधील १०४ वरून आता केवळ २१ फेऱ्या).
advertisement
कपातीमागे प्रशासनाची कारणं
एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घसरणीमागे अनेक तांत्रिक आणि धोरणात्मक कारणं आहेत. यातील महत्त्वाचं म्हणजे महिला सन्मान योजनेचा परिणाम. महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत मिळाल्यापासून त्यांचा ओढा वातानुकूलित 'शिवनेरी' आणि 'विद्युत शिवनेरी'कडे वाढला आहे. याशिवाय,बसगाड्यांची कमतरता, चालक-वाहकांची अपुरी उपलब्धता आणि गाड्यांच्या देखभालीचा अभाव यामुळे अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. शिवनेरीच्या फेऱ्यांतही कपात करण्यात आली आहे. याबाबत प्रवाशांचा प्रतिसाद असूनही, मंगळवार ते गुरुवार या दिवसांत प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण देत शिवनेरीच्याही ४ फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत.
advertisement
प्रवाशांची वणवण
सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी बस उपलब्ध नसल्याने नोकरदार आणि नियमित प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी वेळेवर मिळत नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने खासगी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीही आता वाढू लागल्या आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 10:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
दादर-पुणे प्रवाशांचे हाल; हिरकणीसह शिवशाही बसच्या फेऱ्यांमध्ये 78 टक्क्यांची घट, ST प्रशासनानं दिली 3 अजब कारणं









