Pune News: पुण्यातील औद्योगिक पट्ट्याचा 'श्वास' होणार मोकळा! 3100 कोटीच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला मुहूर्त मिळाला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्वरूप अत्यंत आधुनिक असून, तळेगाव ते चाकण रासे फाटा या २४ किलोमीटरच्या टप्प्यात चारपदरी उड्डाणपूल उभारला जाणार आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्याचा श्वास मानल्या जाणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या नूतनीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या ५४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाच्या निविदा मंगळवारी अधिकृतपणे खुल्या करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) वतीने राबवल्या जाणाऱ्या या ३१०० कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पासाठी चार बड्या कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. ज्यातील पात्र कंपनीकडे आता या कामाची धुरा सोपवण्यात आली आहे. चाकण, तळेगाव आणि रांजणगाव या औद्योगिक वसाहतींमधील अवजड वाहतुकीमुळे हा मार्ग कायमच गजबजलेला असतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था आणि अपघातांचे सत्र यामुळे नागरिक त्रस्त होते. आता हा मार्ग नव्याने विकसित होणार असल्याने उद्योग क्षेत्रासह स्थानिक प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्वरूप अत्यंत आधुनिक असून, तळेगाव ते चाकण रासे फाटा या २४ किलोमीटरच्या टप्प्यात चारपदरी उड्डाणपूल उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे या उड्डाणपुलाच्या खाली चारपदरी सेवा रस्ता असणार असल्याने, तळेगाव ते चाकण हा संपूर्ण मार्ग प्रत्यक्षात आठपदरी होणार आहे. उर्वरित चाकण ते शिक्रापूर हा टप्पा चारपदरी महामार्ग म्हणून विकसित केला जाईल. हा संपूर्ण प्रकल्प 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर राबवला जाणार असून प्रवाशांना या मार्गावर टोल द्यावा लागणार आहे. संबंधित कंपनीला कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, या प्रकल्पामुळे औद्योगिक विकासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 7:33 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यातील औद्योगिक पट्ट्याचा 'श्वास' होणार मोकळा! 3100 कोटीच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला मुहूर्त मिळाला








