सुकट ते खारे मासे, पुण्यातील 95 वर्षे जुनं बोंबील मार्केट, खवय्यांचे आजही आवडते ठिकाण, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
अनेक दशकांपासून येथे वाळवलेले बोंबील, सुकट, बांगडा आणि विविध प्रकारचे खारे मासे घाऊक तसेच किरकोळ स्वरूपात विकले जातात. त्यामुळे ही बाजारपेठ केवळ खवय्यांसाठीच नव्हे तर व्यापाऱ्यांसाठीही महत्त्वाचे केंद्र ठरली आहे.
पुणे : शहरात अनेक ऐतिहासिक बाजारपेठा आजही जुन्या परंपरा आणि खाद्यसंस्कृती जपताना दिसतात. त्यापैकीच एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणजे बोंबील मार्केट. पुण्यातील शुक्रवार पेठेतील नेहरू चौक परिसरात वसलेली ही बाजारपेठ सुक्या माशांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. अनेक दशकांपासून येथे वाळवलेले बोंबील, सुकट, बांगडा आणि विविध प्रकारचे खारे मासे घाऊक तसेच किरकोळ स्वरूपात विकले जातात. त्यामुळे ही बाजारपेठ केवळ खवय्यांसाठीच नव्हे तर व्यापाऱ्यांसाठीही महत्त्वाचे केंद्र ठरली आहे.
या बाजारपेठेचा इतिहास देखील तितकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. 1930 पूर्वी या परिसरात झोपड्या होत्या. ब्रिटिश काळात येथे राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आणि त्या ठिकाणी सुक्या माशांच्या व्यापारासाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारण्यात आली. त्यामुळे बोंबील मार्केटचा इतिहास शतकाच्या जवळपास पोहोचलेला असल्याचे सांगितले जाते. पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई आणि बोंबील मार्केट ही जवळपास समकालीन बाजारपेठा मानल्या जातात.
advertisement
सध्या या बाजारपेठेत सुमारे 80 हून अधिक स्टॉल्स असून अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय सांभाळत आहेत. काही विक्रेत्यांची तिसरी आणि चौथी पिढी आजही येथे मासळी विक्री करत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे ही बाजारपेठ स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनली आहे. महाराष्ट्रातील विविध किनारी भागांतून येथे सुक्या मासळीचे मोठ्या प्रमाणात येतात. त्यानंतर किरकोळ व्यापारी आणि ग्राहक येथे येऊन खरेदी करतात.
advertisement
बोंबील मार्केटमध्ये एकाच ठिकाणी सुक्या मासळीचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. बोंबील, सुकट, सोडे, सुरमई, बांगडा, अंबाडी, धोमा, टेंगली, मांदेली, खारे मासे अशा सुमारे 16 प्रकारांची मासळी येथे विक्रीसाठी येतात. सुकटाची चटणी, सोड्याचे कालवण यांसारख्या पारंपरिक पदार्थांसाठी पुणेकर मोठ्या उत्साहाने येथे खरेदी करताना दिसतात. त्यामुळे ही बाजारपेठ पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा एक वेगळा आणि महत्त्वाचा भाग बनली आहे.
advertisement
ही बाजारपेठ पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असून प्रशासनाचे याकडे अपेक्षित लक्ष नसल्याची खंत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुणे फिश मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सिद्धे यांच्या मते, सुक्या मासळीची महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी मंडई असून किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ती महत्त्वाचे केंद्र आहे. योग्य सुविधा आणि देखभाल मिळाल्यास या ऐतिहासिक बाजारपेठेचे जतन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 4:40 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
सुकट ते खारे मासे, पुण्यातील 95 वर्षे जुनं बोंबील मार्केट, खवय्यांचे आजही आवडते ठिकाण, Video








