Pune Crime: स्वच्छतागृहातील त्या कैद्याच्या हालचालींमुळे मोठं कांड उघड; येरवडा कारागृहात तपासणीदरम्यान आढळल्या धक्कादायक वस्तू
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या घटनेनंतर २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा या वेळेत कारागृहात मोठी शोधमोहीम राबवण्यात आली.
पुणे : अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारागृह प्रशासनाने घेतलेल्या झाडाझडतीत कैद्यांच्या बराकीत चक्क पाच मोबाईल संच, दोन पॉवर बँक आणि चार्जिंग वायर असे साहित्य सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सराईत कैदी नौशाद बद्रुद्दीन शेख याच्यासह इतर कैद्यांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गस्तीदरम्यान फुटलं भांडं
२१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहायक तुरुंगाधिकारी सुनील गायकवाड नियमित गस्त घालत असताना, त्यांना कारागृहातील स्वच्छतागृहाजवळ एक कैदी संशयास्पद रितीने थांबलेला दिसला. त्याची चौकशी केली असता, त्याने तिथे जमिनीवर मोबाईल पडल्याचे सांगितले. हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिला.
या घटनेनंतर २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा या वेळेत कारागृहात मोठी शोधमोहीम राबवण्यात आली. बराक क्रमांक १ मधील कैदी नौशाद शेख याच्या पिशवीत एक मोबाईल, बॅटरी, सिम कार्ड आणि चार्जिंग वायर सापडली. बराक क्रमांक १, २ आणि ६ ची कसून तपासणी केली असता, तिथे आणखी चार मोबाईल संच, बॅटरी आणि दोन पॉवर बँक मिळून आल्या.
advertisement
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कारागृहाच्या भिंतींच्या आत आणि विशेषतः बराकीत मोबाईल आणि पॉवर बँक पोहोचलेच कसे? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या साहित्याचा वापर करून कैदी बाहेरच्या जगाशी संपर्क साधत होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, कारागृह प्रशासनातील कोणाचे संगनमत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 11:08 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: स्वच्छतागृहातील त्या कैद्याच्या हालचालींमुळे मोठं कांड उघड; येरवडा कारागृहात तपासणीदरम्यान आढळल्या धक्कादायक वस्तू








