गणेशोत्सवात बाप्पाला काय नैवेद्य दाखवावा? जाणून घ्या शास्त्र
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गणेशोत्सव काळात आपल्या बाप्पाला रोजचा नैवद्य काय असावा? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबतच अरविंद वेदांते गुरुजींनी माहिती दिलीय.
कोल्हापूर, 13 सप्टेंबर: गणेशोत्सव म्हटलं की बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागते. घरगुती गणेशोत्सव जरी काहीच दिवसांचा असला तरी त्या दिवसात आपल्या बाप्पाला काही कमी पडता कामा नये, अशीच प्रत्येकाची भावना असते. मग त्यात सजावटीपासून नैवेद्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असतो. यातच बाप्पाला गणेश चतुर्थीपासून विसर्जन होईपर्यंत नेमका काय काय नैवेद्य दाखवायचा, ही गोष्ट देखील बऱ्याच जणांना विचारात टाकणारी असते. याबाबतच कोल्हापूर येथील पुजारी अरविंद वेदांते गुरुजी यांनी माहिती दिली आहे.
गणपती बाप्पाला लागणाऱ्या सर्व साहित्यांची खरेदी करून घरात आधीच सगळी तयारी केली जाते. जेणेकरून गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणारायाची मनोभावे पूजा करता यावी. यातच बाप्पासमोर वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य ठेवला जातो. सर्व गोडधोड पदार्थ, फळे, सुका मेवा आदी घटक बाप्पसमोर मांडून ठेवले जातात. मोदक हा गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ असल्याने मोदक देखील बाप्पाला अवश्य अर्पण करायाला हवेत, असे वेदांते गुरुजी सांगतात.
advertisement
गूळ खोबरे आणि मोदक सर्वात महत्त्वाचे
गणपतीला दाखवायचा नैवेद्य म्हटलं की, सर्वप्रथम मोदक आणि गुळखोबरे या गोष्टी असायला हव्यात. मोदक हे तांदूळ, नारळ आणि गूळ यांच्यापासून तयार केले जातात. तांदळाचे मोदक करताना तांदळाच्या पिठाची उकड काढून त्याच्या मऊ पारीत गूळ आणि खोबऱ्याचं सारण भरतात. त्याला भरपूर कळ्या करून मोदकाचा सुंदर आकार दिला जातो. नंतर उकडून ते बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. त्याचबरोबर कच्च्या खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये गुळाचा खडा ठेवून तो नैवेद्य देखील गणपती बाप्पाजवळ कायम ठेवला जातो. असे देखील वेदांते यांनी सांगितले.
advertisement
गणेश चतुर्थीला गव्हाची खीर
महाराष्ट्रात विविध धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गव्हाची खीर हा पारंपरिक पदार्थ आवर्जून बनवला जातो. खायला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही खीर गणपती बाप्पाचा देखील आवडता पदार्थ आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या कमी साहित्यात हा पदार्थ तयार केला जातो. तो देखील एक महत्त्वाचा नैवेद्य असतो, असेही वेदांते गुरुजींनी सांगितले.
advertisement
रोजचा वेगळ्या पदार्थांचा नैवेद्य
गणेशोत्सव काळात प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य गणरायाला दाखवायला हवा. त्यामध्ये रोज पेढे, बर्फी, खडी साखर, फळे असा नैवेद्य आपण दाखवू शकतो. शिवाय महानैवेद्यही दाखवला जातो. यामध्ये रोजच्या पेक्षा थोडं वेगळं संपूर्ण जेवण बनवून देखील तो महानैवेद्य म्हणून गणरायाला दाखवला जातो.
advertisement
गौरी आगमन आणि पूजनवेळी
गौरी आगमन आणि पूजनाच्या वेळी देखील विशेष नैवेद्य बनवला जातो. गौरी आगमनाच्या दिवशी शिदोरी वाटण्याची पद्धत आहे. त्यामध्ये भाकरी आणि झुमक्याची वडी यांचा समावेश असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाच्या वेळी वऊसा असतो. त्यावेळी गौरीला सजवून गौरीचे वऊसा पूजन करताना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर गणपती विसर्जनाच्या दिवशी रोजचा महानैवेद्य दाखवूनच नंतर गणेश विसर्जन केले जाते.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 13, 2023 9:18 AM IST