शारदीय नवरात्र म्हणजे काय? कसे असते नवरात्रीतील उपवासाचे व्रत ?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गणेशोत्सवानंतर सर्वांना वेध लागतात ते शारदीय नवरात्रौत्सवाचे. देवीसाठी व्रत, उपवास करत नवरात्रीचे नऊ दिवस कसे सरतात, हे कळत देखील नाही. मात्र या नवरात्री बद्दलची योग्य माहिती आजही क्वचितच काही जण जाणतात.
कोल्हापूर, 30 सप्टेंबर : महाराष्ट्रात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने येतो गणेशोत्सव. तर गणेशोत्सवानंतर सर्वांना वेध लागतात ते शारदीय नवरात्रौत्सवाचे. देवीसाठी व्रत, उपवास करत नवरात्रीचे नऊ दिवस कसे सरतात, हे कळत देखील नाही. मात्र या नवरात्री बद्दलची योग्य माहिती आजही क्वचितच काही जण जाणतात. याबद्दलच कोल्हापूर येथील अभ्यासक डॉ प्रसन्न मालेकर यांनी माहिती दिलीय.
दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमी प्रीत्यर्थ नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यंदा 14 ऑक्टोबर रोजी घटस्थापना आणि 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी आहे. नवरात्रौत्सवात नऊ दिवस देवीची पूजाअर्चा करून, व्रत-उपवास करुन भक्तिभावाने आणि शुध्द अंतःकरणाने देवीची आराधना केली जाते. या नवरात्र महोत्सवात व्रत पालनाला विशेष असे महत्त्व आहे. यामध्ये अनेक भाविक वेगवेगळ्या नियमांनी हे व्रत पूर्ण करत असतात, असे मंदिर अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.
advertisement
कसा असतो शारदीय नवरात्रौत्सव?
देवीच्या या शारदीय नवरात्रौत्सवातील घटस्थापनेचा पहिला दिवस हा महत्वाचा मानला जातो. घरोघरी मातीच्या घटांची स्थापना या दिवशी केली जाते. यामध्ये ताम्हणात माती पसरून त्याच्या मध्ये आपल्या कुलदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली जाते. अगदी स्वच्छ करुन निवडून घेतलेल्या मातीच्या त्या घटात गहू, ज्वारी, मका अशी सप्त धान्य पेरली जातात. तर घटाजवळ नवरात्रीत दिवस-रात्र नंदादीप तेवत ठेवला जातो. हा देखील नवरात्रौत्सवाच्या व्रताचाच एक भाग आहे. तर पुढे घटस्थापनेनंतर प्रत्येक दिवसानुसार पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ असे मोजले जाते, असेही प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.
advertisement
नवरात्राच्या नवव्या माळेला खंडेनवमी असे म्हणतात. या दिवशी घरातील सर्व शस्त्रे आणि यंत्र साहित्य पूजण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बऱ्याच कामाच्या ठिकाणी देखील यादिवशी मशीन्स पुजली जातात. तर दुसऱ्या दिवशी अर्थात दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असतो. या दिवशी आपट्याच्या किंवा शमीच्या झाडाची पाने ‘सोनं घ्या.. अन् सोन्यासारखे रहा..’ असे म्हणत सर्वांना वाटण्याची परंपरा आहे.
advertisement
नवरात्रीच्या उपवासाचे व्रत..
नवरात्र उत्सव साजरा करताना रोज उपवास करण्याची पद्धत रूढ आहे. हे उपवासाचे व्रत करताना प्रत्येकाची जशी इच्छा किंवा श्रद्धा असेल तशा पद्धतीने, तसेच आपल्याला जमेल त्या तसे हे व्रत करत असतात. यामध्ये काहीजण नऊ दिवस एक भुक्त म्हणजे फक्त एक वेळ जेवण करतात. काहीजण नऊ दिवस पूर्णपणे उपवास धरुन व्रत पूर्ण करतात. तर काही जणांकडे प्रतिपदा आणि अष्टमी या दोन दिवशी उपवास करुन देवीची उपासना केली जाते. या उपावसावेळी घेतल्या जाणाऱ्या फराळ किंवा फलाहार यामध्ये देखील अनेक ठिकाणी वैविध्य आढळून येते. या दिवसांत पचनास हलके पदार्थ जसे फळांवर उपवास धरणे योग्य मानले जाते. मात्र काही ठिकाणी तर फक्त देवतेच्या तिर्थांवर हा उपवास केला जातो, असेही प्रसन्न मालेकर यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान, नवरात्र उत्सव हे आंतरिक शक्ती जागवण्याचे व्रत आहे. त्यामुळेच शक्ती अर्थात देवीच्या उपासनेसाठी या व्रताला भक्तांमध्ये एक वेगळे स्थान आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 30, 2023 3:13 PM IST