Paush Purnima 2026: पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं का म्हणतात? दा.कृ.सोमण यांनी दिली माहिती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Paush Purnima 2026 Date: वर्षातील पहिली पौर्णिमा शनिवारी 3 जानेवारी 2026 रोजी असून तिला शाकंभरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. प्रत्येक चांद्रमहिन्याच्या पौर्णिमेला काही तरी विशेष महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमेला जसे...
advertisement
मुंबई : नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा शनिवारी 3 जानेवारी 2026 रोजी असून तिला शाकंभरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. प्रत्येक चांद्रमहिन्याच्या पौर्णिमेला काही तरी विशेष महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमेला श्री हनुमान जयंती, वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा, आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा - व्यास पौर्णिमा, श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा- रक्षाबंधन, भाद्रपद पौर्णिमेला प्रौष्ठपदी पौर्णिमा, आश्विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्तजयंती, पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा, माघ पौर्णिमेला माघस्नान समाप्ती आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असते. अर्थात या प्रत्येकाचा दिवस ठरविण्याचे नियम मात्र वेगवेगळे आहेत. याविषयी ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिलेली माहिती जाणून घेऊ.
advertisement
तर यापैकी शाकंभरी पौर्णिमा आणि प्रौष्ठपदी पौर्णिमा याबद्दलची माहिती सर्वांना असतेच असे नाही. शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते. महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही कुलदेवता आहे. शाकंभरी देवीला बनशंकरी असे आणखी एक नाव आहे. हिचे मुख्य स्थान विजापूरजवळ बदामी येथे आहे.
देवीभागवत ग्रंथामध्ये हिच्या उत्पत्तीविषयी एक कथा आहे. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या. त्या भूकेलेल्यांना खावू घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले. दुसऱ्या एका कथेप्रमाणे हरिद्वार- केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्षे केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाने विख्यात झाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात असे सांगण्यात आले आहे.
advertisement
बनशंकरी ही शैव देवता आहे. हिचे मूळ नाव शाकंभरी आहे. बदामी येथे हिचे मंदिर आहे. ही अष्टभुजा असून तिच्या आठही हातात आयुधे आहेत. ती सिंहावर बसली आहे. हिच्या पायाखालीलदोन हत्ती आहेत. देवीच्या प्रमुख मूर्तीच्या डाव्या बाजूस बाहुल्यांप्रमाणे चार मूर्ती आहेत. दर शक्रवारी या देवीची पालखी निघते.
advertisement
या कथांपासून आपण बोध घ्यावयाचा आहे. दुष्काळात धान्योत्पादन जरी कमी झाले तरी केवळ भाजीपाला खाऊन आपला जीव आपणास वाचवता येतो. भाजीपाल्यामध्ये जीवनसत्त्वे असतात. दुष्काळ नसतानाही नेहमी आपल्या आहारात आपण भाजीपाल्याचा समावेश करायला पाहिजे. मात्र ही पालेभाजी वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात धुवावयास हवी. आधुनिक काळात आपण आपल्या घराच्या परिसरात पालेभाज्यांची लागवड करू शकतो. आपल्या घरात जो ओला कचरा निर्माण होतो त्याचे खत करून पालेभाजी उत्पादनासाठी आपण वापरू शकतो. त्यासाठी फक्त जरूरी असते ती म्हणजे पालेभाजी उत्पादनाच्या ज्ञानाची आणि मेहनतीची. पण स्वत:ला लागणाऱ्या पालेभाज्या आपणच तयार करून आपल्या शरीराचे आरोग्य आपण चांगले ठेवू शकतो. अळू, माठ, मुळा, मेथी, पालक इत्यादी पालेभाज्या आपण आपल्या आहारात ठेवल्याने शरीराचे आरोग्य चांगले राहीलच, शिवाय ही निर्मिती करीत असतानाचा आनंद आपले दु:ख, चिंता विसरायला लावू शकतो.
advertisement
पौष शुक्ल सप्तमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरे केले जाते. शाकंभरी देवीची पूजा करण्याबरोबरच आपण जर आपल्या परिसरांत स्वत:च पालेभाज्या निर्माण करून त्या जर भोजनात वापरल्या तर शाकंभरी देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि पुढच्या नव्हे तर याच जन्मात आपल्या शरीराचे व मनाचे आरोग्य चांगले ठेवील यात तिळमात्र शंका नाही.
advertisement
हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी स्नान, जप आणि दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे मानले जाते. यावर्षीच्या पौष पौर्णिमेचा काळ आणि दानाचे नियम खालीलप्रमाणे आहेत:
पौष पौर्णिमा तिथीची वेळ
पौष पौर्णिमा तिथीचा प्रारंभ: आज, 2 जानेवारी, शुक्रवार, 06:53 PM पासून पौष पौर्णिमा तिथीचा समापन: उद्या, 3 जानेवारी, शनिवार, 03:32 PM पर्यंत
पौष पौर्णिमेला काय दान करावे?
पौष पौर्णिमेचा संबंध चंद्राशी असतो. त्यामुळे या दिवशी पवित्र नदीत किंवा घरीच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान केल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दान करावे. दानासाठी खालील वस्तू उत्तम मानल्या जातात:
पांढऱ्या वस्तूंचे दान: चंद्र देव प्रसन्न होण्यासाठी तांदूळ, दूध, साखर, पांढरे कपडे आणि पांढरे चंदन यांचे दान करावे.
मौल्यवान धातू आणि रत्न: कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत करण्यासाठी चांदी किंवा मोती दान करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
गरजेच्या वस्तूंचे दान: थंडीचा महिना असल्याने गरजू लोकांना गरम कपडे, ब्लँकेट, अन्न आणि फळांचे दान करावे.
धार्मिक दान: भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी शिव चालीसाच्या प्रतींचे वाटप किंवा दान करणे शुभ मानले जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 9:54 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Paush Purnima 2026: पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं का म्हणतात? दा.कृ.सोमण यांनी दिली माहिती









