युद्धाला निघण्यापूर्वी पेशवे घ्यायचे दर्शन, पुण्याची ग्रामदेवता तांबडी का आहे? Video

Last Updated:

पुण्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत. येथील ग्रामदेवता म्हणून तांबडी जोगेश्वरी देवीची पूजा केली जाते.

+
युद्धाला

युद्धाला निघण्यापूर्वी पेशवे घ्यायचे दर्शन, पुण्याची ग्रामदेवता माहितीये का?

पुणे, 10 ऑक्टोबर: भारतात प्रत्येक गावाची एखादी ग्रामदेवता असतेच. तसेच पुणे येथील ग्रामदेवता म्हणून तांबडी जोगेश्वरी देवीला ओळखलं जातं. अत्यंत पुरातन असणाऱ्या या मंदिराचा इतिहासही तितकाच जुना आहे. तसेच ही देवी अनेक महाराष्ट्रीयन कुटुंबाची कुलस्वामिनी देखील आहे. पेशवे काळात या देवीच्या दर्शनानेच सर्व शुभ कार्यांची सुरुवात होत असल्याचं सांगतिलं जातं. त्यामुळे पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराला धार्मिक आणि ऐतिसाहिक महत्त्व आणि वारसा आहे.
पुण्याची ग्रामदेवता असलेली तांबडी जोगेश्वरी ही पुण्यातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. हल्ली ज्या ठिकाणी कसबा पेठ आहे त्या ठिकाणी पूर्वी पुनवडी नावाचं छोटेसं गाव होतं. त्या गावाच्या हद्दीवर, आंबील ओढ्याचे काठी ग्राम संरक्षक ग्रामदेवता म्हणून या देवीची घुमटी होती. ही देवी स्वयंभू आहे. तसेच ही मूर्ती पाषाणाची, सव्वा हात उंच उभी असून चतुर्भुज आहे. वरील दोन हातात उजव्या हातात डमरु व डाव्या हातात त्रिशूळ आहे. खालच्या दोन हातात मानव जातीस कृपा आशिर्वाद आणि पानपात्र आहे. ही जोगेश्वरी माहेश्वरी, सावित्री आणि चामुंडा अशा देवत्रयात्मक आहे, असे पुजारी सांगतात.
advertisement
ग्रामदेवता आणि कुलस्वामिनी
जोगेश्वरी देवी किंवा योगेश्वरी देवी या नावाने ओळखली जाणारी ही दुर्गादेवी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची, विशेषतः कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण आणि कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. प्राचीन ग्रामीण भारतात प्रत्येक खेडेगावाला एक ग्रामदेवता असते. ती देवता त्या गावात राहणार्‍या लोकांचे संकटांपासून, दुष्ट शक्तींपासून रक्षण करून त्यांची भरभराट होण्यास मदत करते. या श्रद्धेने ग्रामस्थ ग्रामदेवतेची आराधना करतात. 16 व्या शतकातील ऐतिहासिक पुराव्यांवरून तांबडी जोगेश्वरी हे पुणे कसब्याचे ग्रामदैवत होते, असे आढळते.
advertisement
पेशव्यांच्या काळात मंदिराला महत्त्व
पेशव्यांच्या काळात देवीची घुमटी असलेली जमीन पेशव्यांच्या ताब्यात आली. तेव्हा पुणे गावठाणाची जागा मोठी करण्याची गरज भासली. त्यामुळे पेशव्यांनी ती शेतजमीन देवळासाठी देऊन त्या ठिकाणी जोगेश्वरी देऊळ बांधून पूजेची व्यवस्था केली. तर शिवकालापासून म्हणजे सुमारे तीनशे वर्षांपासून बेंद्रे घराणे जोगेश्वरी देवतेचे पुजारी असल्याचा दाखला इतिहासात सापडतो, असं पोफळे गुरुजी सांगतात.
advertisement
का म्हणतात तांबडी जोगेश्वरी?
या देवीस तांबडी जोगेश्वरी संबोधण्याचे कारण म्हणजे ही शेंदूर चर्चित आहे. तसेच महिषासुराचे जे 12 सेनापती होते त्यापैकी ताम्रासुराचा वध या देवीने केला. म्हणून तिला ताम्र जोगेश्वरी म्हणजेच तांबडी जोगेश्वरी असे म्हणतात. याच नावानं या देवीला ओळखळं जातं, असं गुरुजी सांगतात.
advertisement
पेशवे शुभ कार्यावेळी घ्यायचे दर्शन
या देवीस विशेष महत्व मिळण्याचे कारण म्हणजे पेशव्यांचे कुलदैवत योगेश्वरी ही कोकणातील श्रीवर्धन येथील आहे .परंतु पेशव्यांचे वास्तव्य पुण्यात असल्यामुळे त्यांना नेहमी कोकणात जाणे शक्य होत नव्हते. तेव्हा त्यांनी पुण्यात या जोगेश्वरीला आणले आणि कुलदैवत योगेश्वरी मानले. त्यामुळे पेशवे स्वतः लढाईस जाताना व परत येताना या देवीचे दर्शन घेण्यास चुकत नसत. पेशव्यांची कुटुंबीयसुद्धा या देवीचे दर्शन घेऊन खणानारळाची ओटी भरत असत, अशी पेशवे दफ्तरात नोंद आहे.
advertisement
पुणेकरांचं श्रद्धास्थान
या जोगेश्वरीस पुण्याची ग्रामदेवता मानल्यामुळे लग्राची अक्षता, वास्तूपूजनाचे निमंत्रण प्रथम देवीस दिले जाते. मुंजीची भिक्षावळ व लग्नाची वरात या देवीस येते. रोज सकाळी देवीस श्रीसुक्ताचा अभिषेक केला जातो. त्यानंतर देवीस मुखवटा लावून साडी नेसविली जाते. प्रत्येक सणाच्या दिवशी देवीची महापूजा करण्यात येते, अशी माहिती देवीचे पुजारी पोफळे गुरुजी यांनी सांगितली आहे.
advertisement
नवरात्रीत मोठा उत्सव
देवीचा मुख्य उत्सव म्हणजे अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सव होय. जोगेश्वरीची दसऱ्याला पालखीतून मिरवणूक निघते. मंदिराला जोडून समोरच सभामंडप आहे. सभामंडप दगडी असून त्याच्या माथ्यावर कलश आहे. मंडपात प्रवेश करताना सुरुवातीलाच देवीकडे तोंड करून असलेली एक सिंहाची मूर्ती आहे. सिंह हे देवीचे वाहन समजले जाते. मंडपात विठ्ठल रुक्मिणीची आणि नागासह गणेशाची छोटी मूर्ती आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/Temples/
युद्धाला निघण्यापूर्वी पेशवे घ्यायचे दर्शन, पुण्याची ग्रामदेवता तांबडी का आहे? Video
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement