अजबच! महाराष्ट्रात इथं आहे ‘नवरा-नवरी’चं मंदिर, नवसासाठी होते गर्दी, पण 'ते' गूढ आजही कायम, Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Navra Navri Temple: आज हे ठिकाण केवळ एक आख्यायिका नसून एक 'जागृत देवस्थान' म्हणून ओळखले जाते.
सोलापूर - एकीकडे सनई-चौघड्यांचे सूर, दुसरीकडे माहेर सोडताना डोळ्यात दाटलेलं पाणी आणि सासरच्या नव्या आयुष्याची ओढ... असाच एक लग्नसोहळा आटोपून वरात मुख्य रस्त्यावरून निघाली होती. बँड-बाजाचा कडकडाट आणि वऱ्हाड्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. पण अचानक असं काही अघटित घडलं की, पाहता पाहता बैलगाडीसह अख्खी वरात गायब झाली, अशी आख्यायिका सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि माढा तालुक्याच्या सीमा भागात आजही सांगितली जाते.
पंढरपूर तालुक्यातील करकंब आणि माढा तालुक्यातील मोडनिंब या दोन गावांच्या सीमेवर 'नवरा-नवरी'चे एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक थक्क करणारी आख्यायिका ग्रामस्थ नारायण माने यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितली.
अनेक वर्षांपूर्वी एक वरात अतिशय थाटामाटात या रस्त्यावरून निघाली होती. सजवलेली बैलगाडी, त्यात बसलेली नवरी आणि शेकडो वऱ्हाडी जल्लोषात जात असताना, या सीमाभागात वरात आल्यावर अचानक अदृश्य झाली. ती वरात नेमकी कुठे गेली, त्यांना जमिनीने गिळलं की काय झालं, हे आजही एक न सुटलेलं गूढ आहे. याच ठिकाणी आता नवरा-नवरीचे मंदिर असून भाविकांचे ते श्रद्धास्थान बनले आहे.
advertisement
आज हे ठिकाण केवळ एक आख्यायिका नसून एक 'जागृत देवस्थान' म्हणून ओळखले जाते. या मंदिराबाबत भाविकांची मोठी श्रद्धा आहे. मंदिरात नवरा-नवरीच्या मूर्तींसह म्हसोबाची देखील मूर्ती आहे. अनेक भाविक या ठिकाणी येऊन मागणं मागतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर मोठ्या श्रद्धेने आपला नवस फेडतात, असं गावकरी सांगतात.
आजूबाजूच्या अनेक गावांतील लोकांसाठी हे मंदिर आस्थेचा विषय ठरत आहे. दररोज या ठिकाणी रीतसर पूजा-अर्चा केली जाते. एका रहस्यमयी घटनेतून उदयाला आलेलं हे मंदिर आज भक्तांच्या हाकेला धावणारं 'नवसाला पावणारे नवरा-नवरी' मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 12:25 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
अजबच! महाराष्ट्रात इथं आहे ‘नवरा-नवरी’चं मंदिर, नवसासाठी होते गर्दी, पण 'ते' गूढ आजही कायम, Video







