IND vs SL : भारत-श्रीलंकेमध्ये सुपर ओव्हरचा थरार, हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा रोमांचक विजय
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला.
दुबई : आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. भारताने दिलेल्या 203 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 5 विकेट गमावून 202 रन करता आल्या, त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला फक्त 2 रनच करता आल्या, यानंतर भारताने पहिल्याच बॉलला 3 रन काढून रोमांचक विजय मिळवला.
शेवटच्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला विजयासाठी 11 रनची गरज होती. यानंतर ओव्हरच्या पहिल्याच बॉलला हर्षित राणाने शतकवीर पथुम निसांकाची विकेट घेतली, पण तरीही उरलेल्या 5 बॉलमध्ये श्रीलंकेला 10 रन करता आल्या, त्यामुळे मॅच टाय झाली.
भारताने दिलेल्या 203 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा ओपनर कुसाल मेंडिस पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. पण यानंतर पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी वादळी बॅटिंग केली. परेराने 32 बॉलमध्ये 58 रनची खेळी केली. तर पथुम निसांकाने 58 बॉलमध्ये 107 रन केले. निसांकाच्या या इनिंगमध्ये 7 फोर आणि 6 सिक्स मारले. दासुन शनाकाने 11 बॉलमध्ये 22 रनची खेळी केली. भारताकडून हार्दिक पांड्या,अर्शदीप सिंग, हर्षीत राणा, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीला एक-एक विकेट मिळाली.
advertisement
भारताविरुद्धच्या या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने दुसऱ्याच ओव्हरमध्ये गिलची विकेट गमावली, तरी अभिषेक शर्माने श्रीलंकेच्या बॉलिंगवर आक्रमण सुरूच ठेवलं. अभिषेक शर्माने 31 बॉलमध्ये 196.77 च्या स्ट्राईक रेटने 61 रन केल्या, ज्यात 8 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय तिलक वर्माने 34 बॉलमध्ये नाबाद 49 रनची खेळी केली. संजू सॅमसनने 23 बॉलमध्ये 39 आणि अक्षर पटेलने 15 बॉलमध्ये नाबाद 21 रन केले. भारतीय खेळाडूंच्या या आक्रमक बॅटिंगमुळे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 202 रन केले. यंदाच्या आशिया कपमधला हा कोणत्याही टीमचा सर्वाधिक स्कोअर आहे.
advertisement
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाने प्लेयिंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली. या दोघांऐवजी हर्षीत राणा आणि अर्शदीप सिंग यांना संधी देण्यात आली. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यानंतर टीम इंडिया आता रविवार 28 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध आशिया कपची फायनल खेळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 12:37 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SL : भारत-श्रीलंकेमध्ये सुपर ओव्हरचा थरार, हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा रोमांचक विजय