Asia Cup : आशियामध्ये टीम इंडियाच वाघ, फायनलमध्ये दक्षिण कोरियाला चिरडलं, वर्ल्ड कपलाही थेट एन्ट्री!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतीय हॉकी टीमने पुन्हा एकदा आशिया कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय टीमने 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरुष हॉकी आशिया कप जिंकला आहे.
मुंबई : भारतीय हॉकी टीमने पुन्हा एकदा आशिया कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय टीमने 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरुष हॉकी आशिया कप जिंकला आहे. राजगीर येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय टीमने गतविजेत्या दक्षिण कोरियाचा 4-1 असा एकतर्फी पराभव केला आणि चौथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह, टीम इंडियाने नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये खेळल्या जाणाऱ्या पुरुष वर्ल्ड कप 2026 साठी देखील पात्रता मिळवली आहे.
बिहारमधील राजगीर येथे पहिल्यांदाच खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत, टीम इंडियाला सुरुवातीपासूनच जेतेपदाचा दावेदार मानले जात होते. प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांच्या टीमने हे दावे आणि अपेक्षा खऱ्या ठरवल्या आणि संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता जेतेपद जिंकले. टीम इंडियाने पूल टप्प्यात त्यांचे तिन्ही सामने जिंकले होते. त्यानंतर सुपर-4 मध्ये, त्यांनी 3 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळाला. भारताला फक्त एका सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. कोरियाविरुद्धचा सामना 2-2 ने बरोबरीत संपला होता.
advertisement
रविवार, 7 सप्टेंबर रोजी झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने धमाकेदार सुरुवात केली आणि पहिल्याच मिनिटात गोल करून 1-0 अशी आघाडी घेतली. स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सुखजीतने टीम इंडियासाठी खाते उघडले. पण, दुसऱ्या गोलसाठी टीमला बराच वेळ वाट पाहावी लागली आणि दिलप्रीत सिंगने पहिल्या हाफच्या समाप्तीच्या फक्त 2 मिनिटे आधी 2-0 अशी आघाडी मिळवून टीमला दिलासा दिला.
advertisement
टीम इंडियाने या सामन्यात वर्चस्व गाजवले पण कोरियन डिफेन्सला भेदणे इतके सोपे नव्हते. यामुळेच तिसरा गोल होण्यासही वेळ लागला पण 45 व्या मिनिटाला यश मिळाल्यावर पुन्हा एकदा दिलप्रीत सिंगने गोल केला. दिलप्रीतचा हा सामन्यातील दुसरा गोल होता. त्यानंतर दक्षिण कोरियाचे पुनरागमन जवळजवळ अशक्य झाले आणि 50 व्या मिनिटाला अमित रोहिदासच्या गोलने उर्वरित आशाही संपुष्टात आणल्या. दक्षिण कोरियाने 57 व्या मिनिटाला गोल केला पण याचा काहीही फरक पडला नाही.
advertisement
भारत चौथ्यांदा विजेता, वर्ल्ड कपमध्येही प्रवेश
नवव्यांदा अंतिम फेरीत खेळणाऱ्या भारतीय टीमने चौथ्यांदा आशिया कपचे विजेतेपद जिंकले. टीम इंडियाने शेवटचे विजेतेपद 8 वर्षांपूर्वी 2017 मध्ये मिळवले होते. आता फक्त दक्षिण कोरिया (5) ने भारतापेक्षा जास्त विजेतेपदे जिंकली आहेत. आशिया कपमधल्या या विजयासोबतच टीम इंडियाला बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 10:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : आशियामध्ये टीम इंडियाच वाघ, फायनलमध्ये दक्षिण कोरियाला चिरडलं, वर्ल्ड कपलाही थेट एन्ट्री!