वडील स्मशानभूमीत कामाला, राहायला घर नाही; पोरानं नाव काढलं, भारतासाठी गोल्ड आणलं!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Inspiring Story: पुणेकर रुद्र नेटके याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले. त्याचे वडील स्मशानभूमीत कामाला असून त्यांना राहण्यासाठी स्वतःचं घरही नाही.
पुणे: परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न पाहण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असेल, तर यश मिळत असतं. पुण्यातील तळजाई माता वसाहतीत राहणारा 14 वर्षीय रुद्र नेटके याने हे सिद्ध करून दाखवलं आहे. वडील स्मशानभूमीत काम करणारे असतानाही, रुद्रने मलेशियामध्ये झालेल्या 24 व्या MILO इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावले.
रुद्रने सांगितले की, “गेली 6 वर्षे मी कराटे सराव करत आहे. मलेशियामध्ये झालेल्या स्पर्धेत भारताकडून 30 संघ सहभागी झाले होते आणि 32 देशांतील खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. चार जणांच्या आमच्या टीमने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. माझ्या आई-वडिलांनी सोनं गहाण ठेवून आणि उसने पैसे उभे करून मला या स्पर्धेसाठी पाठवलं. त्यांच्या त्यागामुळेच मी हे शक्य करू शकलो.”
advertisement
या यशामागे कुटुंबाचा संघर्ष आणि पाठिंबा मोठा आहे. रुद्रचे वडील बाबासाहेब नेटके म्हणाले, “मी स्मशानभूमीत काम करतो. आमची परिस्थिती फारशी चांगली नाही. पण रुद्रला लहानपणापासूनच कराटेची आवड होती. त्याची ही आवड जोपासावी, त्याला संधी द्यावी म्हणून आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले. आमचे मित्र आणि कराटे प्रशिक्षक मोहित सेतिया यांनीही मदत केली.”
advertisement
आई ज्योती नेटके यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रुद्रला लहानपणापासून कराटेची आवड होती. त्याचं हे यश आम्हाला खूप अभिमानाचं वाटतं. आता नातेवाईक आणि आजूबाजूच्यांनी त्याचं कौतुक सुरू केलं आहे. आम्ही आनंदी आहोत, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, रुद्रचं हे यश म्हणजे केवळ वैयक्तिक विजय नाही, तर संघर्षातही यश कसे मिळवता येते याचं जिवंत उदाहरण आहे. रुद्रची पुढची इच्छा भारतासाठी अजून सुवर्णपदक जिंकण्याची आहे. योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाल्यास, हा तरुण खेळाडू देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच उज्ज्वल करेल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 04, 2025 1:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वडील स्मशानभूमीत कामाला, राहायला घर नाही; पोरानं नाव काढलं, भारतासाठी गोल्ड आणलं!