Mount Unam Peak: हाडं गोठवणारी थंडी, श्वास घेणंही कठीण, 3 पुणेकर पोहोचले 6111 मीटर उंच शिखरावर!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
हिमालयाच्या बर्फाच्छादित उंच शिखरावर मराठमोळ्या गिर्यारोहकांनी विजयपताका फडकवली आहे. ‘अॅडव्हेंचर जंक्शन’ या संस्थेच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.
पुणे : हिमालयाच्या बर्फाच्छादित उंच शिखरावर मराठमोळ्या गिर्यारोहकांनी विजयपताका फडकवली आहे. पुण्यातील कृष्णा मरगळे, मानसिंह चव्हाण आणि अनंता कोकरे या तिघांनी हिमाचल प्रदेशातील लाहौल जिल्ह्यातील 6111 मीटर उंच माउंट युनम यशस्वीरित्या सर केले. ‘अॅडव्हेंचर जंक्शन’ या संस्थेच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.
या मोहिमेमध्ये देशभरातून एकूण 30 अनुभवी गिर्यारोहक सहभागी झाले होते. अत्यंत प्रतिकूल हवामान, बर्फवृष्टी, कमी ऑक्सिजन आणि उणे 7 अंश तापमान अशा कठीण परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी ही अवघड मोहीम पूर्ण केली. त्यापैकी केवळ सात जणांना शिखर गाठता आले, यात पुण्यातील तिघांचा समावेश आहे.
advertisement
उंचीचे आव्हान आणि ऑक्सिजनची कमतरता
शिखराच्या उंचीवर ऑक्सिजनची पातळी फारच कमी असते. सुमारे 9.5 टक्के इतकाच ऑक्सिजन उपलब्ध असल्याने अनेकांना श्वास घेणे कठीण जाते. यामुळे मोहिमेपूर्वी शारीरिक आणि मानसिक तयारी अत्यंत आवश्यक ठरते. गिर्यारोहकांना अॅक्लिमटायजेशनसाठी टप्प्याटप्प्याने उंची गाठावी लागली. मनाली, केलॉंग आणि भरतपूर येथे मुक्काम करून ते ‘एडव्हान्स बेस कॅम्प’पर्यंत पोहोचले.
advertisement
शिखर चढाईची सुरुवात रात्री 2 वाजता झाली. थंड पाण्यातून ओढा पार करत, बर्फाच्छादित वाटा ओलांडत सकाळी 10 वाजता गिर्यारोहक शिखरावर पोहोचले. हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गजरात त्यांनी हे यश साजरे केले.
हिमालयातील हवामान क्षणाक्षणाला बदलते. कधी बर्फवृष्टी, तर कधी जोरदार वादळ असा नैसर्गिक आव्हानांचा सामना करत गिर्यारोहकांनी ही मोहीम पार पाडली. बर्फाच्या साचलेल्या थरामुळे वाट चुकण्याचा धोका होता. पाय खोल बर्फात रुतत होता, त्यामुळे प्रत्येक पावलागणिक सावधगिरी होती.
advertisement
उंचीमुळे काही गिर्यारोहकांना हायपोक्सियासारखा त्रास झाला. त्यामुळे त्यांना मोहिमेतून माघार घ्यावी लागली. मानसिंह चव्हाण सांगतात, शरीर आणि मन दोन्ही टणक असावे लागते. मोहिमेतून माघार घेणाऱ्यांचे मनोबल ढासळू नये म्हणून आम्ही सातत्याने त्यांना प्रोत्साहित करत होतो. पुण्याच्या गिर्यारोहकांनी हिमशिखर सर करून राज्याचं नाव उंचावलं आहे. त्यांचं हे यश नवोदित गिर्यारोहकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 03, 2025 6:07 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mount Unam Peak: हाडं गोठवणारी थंडी, श्वास घेणंही कठीण, 3 पुणेकर पोहोचले 6111 मीटर उंच शिखरावर!