Team India : 'प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने आऊट...', गंभीरने पाठ थोपटली, त्याच्यावरच गावसकर संतापले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 72 रननी विजय मिळवला, पण या विजयानंतरही भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर टीम इंडियाच्या खेळाडूवर भडकले आहेत.
चेन्नई : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 72 रननी विजय मिळवला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या दोन खेळाडूंना गवसलेला फॉर्म टीम इंडियासाठी दिलासादायक ठरला. अभिषेकने 30 बॉलमध्ये 55 आणि तिलक वर्माने 16 बॉलमध्ये नाबाद 44 रनची वादळी खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 23 बॉलमध्ये 50 रनची खेळी केली.
या सामन्यात भारताने टीममध्ये दोन बदल केले होते. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेलला आणि रिंकू सिंगच्या ऐवजी संजू सॅमसनला संधी मिळाली. या दोन बदलांमुळे टीम इंडियाला त्यांच्या बॅटिंग क्रमवारीमध्येही बदल करावे लागले. संजू सॅमसन हा ओपनिंगला आला तर इशान किशन तिसऱ्या आणि तिलक वर्मा सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला.
ओपनिंगला आलेल्या संजू सॅमसनने 15 बॉलमध्ये 24 रन केले, ज्यात दोन सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. रिंकूच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये बॅटिंगला आलेल्या संजूने बॅटिंगची सुरूवात केली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.
advertisement
संजू सॅमसनने दुसऱ्या बॉलवर सिक्स मारून शानदार सुरुवात केली. पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने फास्ट बॉलर ब्लेसिंग मुझरबानीवर हल्ला केला आणि एका ओव्हरमध्ये 10 रन केल्या. संजू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण पुन्हा एकदा त्याला चांगल्या सुरूवातीचं रुपांतर मोठ्या खेळीमध्ये करता आलं नाही. चौथ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मुझरबानीने त्याच्या बॉलचा स्पीड कमी केला, ज्यामुळे संजूचा शॉट चुकला आणि डीप मिडविकेटवर रायन बर्लने कॅच पकडला.
advertisement
संजू लवकर आऊट झाला असला तरी भारताला चांगली सुरूवात मिळाली, त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये कोच गौतम गंभीरने संजूची पाठ थोपटली. दुसरीकडे रवी शास्त्री आणि सुनिल गावसकर यांनी संजूच्या शॉटबद्दल नाराजी व्यक्त केली. या शॉटमुळे संजू नाराज होईल, असं रवी शास्त्री कॉमेंट्री करताना म्हणाले. तर गावसकरांनीही सॅमसनच्या आऊट होण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विरोधी टीम संजूला वारंवार शॉर्ट बॉल टाकून आणि स्क्वेअर लेगवर फिल्डर लावून सापळ्यात अडकवतात, असं गावसकर म्हणाले.
advertisement
वेस्ट इंडिजविरुद्ध विजय गरजेचा
झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाने विजय मिळवलेला असला तरी आता टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियाचं आव्हान सुपर-8 स्टेजलाच संपुष्टात येईल.
Location :
Chennai,Tamil Nadu
First Published :
Feb 27, 2026 9:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 'प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने आऊट...', गंभीरने पाठ थोपटली, त्याच्यावरच गावसकर संतापले!









