'जिथे असाल तिथे ठोकू' इराणला मिळाला नवा सुप्रीम लीडर! निवड होताच इस्रायलला दिली धमकी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची निवड झाली असून इस्रायलने त्यांना थेट मृत्यूची धमकी दिली आहे. जगाचे लक्ष युद्धाच्या दिशेकडे आहे.
मध्यपूर्वेतील महायुद्ध आता एका अत्यंत स्फोटक वळणावर येऊन ठेपलं आहे. गेल्या ३७ वर्षांपासून इराणवर हुकूमत गाजवणारे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात मारले गेल्यानंतर, इराणने अखेर आपला नवा लीडर निवडला. खामेनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी आता इराणचे नवे सर्वेसर्वा असतील. मात्र, या निवडीचा आनंद साजरा होण्यापूर्वीच इस्रायलने मोजतबा यांना थेट मृत्यूची धमकी देऊन खळबळ उडवून दिली आहे.
कोण आहेत मोजतबा खामेनी?
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ८८ धर्मगुरुंच्या असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्ट्सने मोजतबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. मोजतबा हे दिवंगत अली खामेनी यांचे दुसरे चिरंजीव आहेत. इराणमध्ये सत्ता वंशपरंपरागत नसते, तरीही रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि धार्मिक वर्तुळात मोजतबा यांचा प्रचंड दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते पडद्यामागून सत्तेची सूत्रं हलवत होते, आता ते अधिकृतपणे इराणचे तिसरे सर्वोच्च नेते बनले आहेत.
advertisement
इस्रायलचा थेट इशारा
मोजतबा खामेनी यांच्या नावाची घोषणा होताच इस्रायली संरक्षण दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. "इस्रायलचा 'लाँग हँड' (लांब हात) खामेनींच्या वारसाचा आणि त्याला नियुक्त करणाऱ्यांचा पाठलाग करणं थांबवणार नाही. आम्ही तुम्हाला लक्ष्य करायला मागेपुढे पाहणार नाही, हा इशारा समजून गतीने पावलं उचला," अशा शब्दांत आयडीएफने मोजतबा यांना थेट लष्करी कारवाईची धमकी दिली आहे.
advertisement
निवड प्रक्रियेत प्रचंड गोपनीयता
२८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवडाभर इराणचे नेतृत्व त्रिसदस्यीय समितीकडे होते. युद्धकाळात सैन्याचं मनोधैर्य टिकवण्यासाठी एका खंबीर चेहऱ्याची गरज होती, म्हणून मोजतबा यांची निवड करण्यात आली. मात्र, इस्रायलच्या धमक्यांमुळे ही संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती.
युद्धाची दिशा बदलणार?
मोजतबा खामेनी यांची नियुक्ती केवळ इराणच्या अंतर्गत राजकारणासाठी नाही, तर अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मोजतबा हे कट्टर विचारांचे मानले जातात. त्यामुळे आता इराण इस्रायलला सडेतोड उत्तर देणार की वाढत्या दबावापुढे नमणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 6:52 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
'जिथे असाल तिथे ठोकू' इराणला मिळाला नवा सुप्रीम लीडर! निवड होताच इस्रायलला दिली धमकी







