Train Accident: २५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनचा भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू १०० हून अधिक जखमी, नेमकं काय घडलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ओक्साका राज्यातील इंटरओशॅनिक ट्रेन अपघातात १३ मृत्यू, ९८ जखमी, राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम आणि गव्हर्नर सलोमन जारा यांनी शोक व्यक्त केला, चौकशी सुरू.
कुणी घरी निघालं होतं तर कुणी बाहेर चाललं होतं. आनंदाने प्रवास करणाऱ्या २५० प्रवाशांच्या आयुष्यात नियतीने अचानक घाला घातला. चिवेला आणि निजांडा शहरांदरम्यान एका तीव्र वळणावर रेल्वेचे नियंत्रण सुटले आणि बघता बघता डबे रुळावरून खाली घसरले. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १३ निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे. दक्षिण मेक्सिकोतील ओक्साका राज्यामध्ये रविवारी एका भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे.
या अपघाताचे स्वरूप इतके भयानक होते की, यामध्ये जवळपास ९८ लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी ३६ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिंतेची बाब म्हणजे यातील पाच जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. रेल्वेचे नऊ कर्मचारी आणि प्रवाशांसह एकूण २५० लोक या ट्रेनमध्ये होते, जे एका क्षणात या संकटाच्या खाईत लोटले गेले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले असून मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. ओक्साकाचे गव्हर्नर सलोमन जारा यांनीदेखील या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध यंत्रणा सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य राबवत आहेत.
advertisement
Tragic accident in Mexico, train derails and falls into valley; 13 passengers killed, 98 injured #mexico #trainaccident #accident pic.twitter.com/k5UNGDE9dM
— Loveleen kaur (@loveleenchanni) December 29, 2025
दुसरीकडे, या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी कायदेशीर चौकशी सुरू करण्यात आली आहे. ॲटर्नी जनरल अर्नेस्टिना गोडोय रामोस यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले की, रेल्वे रुळावरून घसरण्यामागे तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, याचा तपास आता 'ॲटर्नी जनरल' कार्यालयामार्फत केला जात आहे. निजांडा जवळील त्या जीवघेण्या वळणावर नेमके काय घडले, याचा शोध आता घेतला जात आहे.
advertisement
ज्या 'इंटरओशॅनिक' ट्रेनचा हा अपघात झाला, तिची सुरुवात मोठ्या आशेने २०२३ मध्ये करण्यात आली होती. माजी राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पॅसिफिक महासागर आणि आखाती किनारपट्टीला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. पनामा कालव्याला पर्याय म्हणून या मार्गाकडे पाहिले जाते. मात्र, विकासाचा हा नवा मार्ग आज १३ कुटुंबांसाठी कायमचं दुःख देऊन गेला आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी आधुनिक करण्याच्या या प्रवासात आज रक्ताचे डाग लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 11:28 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Train Accident: २५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनचा भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू १०० हून अधिक जखमी, नेमकं काय घडलं









